राजापूर एसटीडेपोसमोरील वाहतुक सुरक्षिततेबाबतच्या प्रश्नाची जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली दखल

सार्वजनिक बांधकाम विभागाला योग्य त्या कार्यवाहीच्या सूचना देणार

राजापूर | प्रतिनिधी : मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरणाच्या कामातील एसटी डेपो समोर प्रलंबीत असलेल्या प्रश्नाची जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी दखल घेतली आहे. या ठिकाणी प्रवाशी व वाहन चालकांच्या सुरक्षिततेबाबत योग्य ती खबरदारी घेण्याच्या व तशा कार्यवाहीच्या सुचना सार्वजनिक बांधकाम महामार्ग विभागाला दिल्या जातील अशी ग्वाही जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी दिली आहे.

मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरणाच्या कामात राजापूर एसटी डेपोसमार भुयारी मार्ग की सर्कल या वादात कोणतेही काम झालेले नाही. मात्र संबधीत ठेकेदार कंपनीकडून महामार्गाचे या ठीकाणचे काम पुर्ण करून वाहतुक सुरू करण्यात आली आहे. मात्र या ठीकाणी वाहतुक सुरक्षिततेबाबत कोणतीच उपाययोजना न केल्याने गंभीर अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.

याबाबत पत्रकार परिषदेत राजापूर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र मोहिते यांनी ही बाब जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांच्या निदर्शनास आणून दिली. यानंतर राजापुर शहरात येताना जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी या ठीकाणी प्रत्यक्ष पहाणी केली. भुयारी मागे की सर्कल हा विषय प्रलंबीत असला तरी सध्या सुरू झालेली वाहतुक व अपघाताचा वाढलेला धोका लक्षात घेता या ठीकाणी प्रवाशी, पादचारी व वाहन चालकांच्या सुरक्षिततेबाबत योग्य त्या उपाययोजना करण्याबाबत संबधित विभागाच्या अधिकाऱ्यांना निर्देश दिले जातील असे जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी यावेळी सांगितले.

याप्रसंगी जिल्हा पोलीस अधिक्षक धनंजय कुलकर्णी, प्रांताधिकारी वैशाली माने, तहसीलदार सौ. शीतल जाधव, राजापूर मुख्याधिकारी प्रशांत भोसले आदी उपस्थित होते.