
राजापुरातील पुरपरिस्थितीची व दरड प्रवण गावांची केली पहाणी
अर्जुना व कोदवली 100 टक्के गाळ मुक्त होणार
तालुक्यातील आपत्तीचा घेतला आढावा
राजापूर | प्रतिनिधी : अति धोकादायक दरडप्रवण क्षेत्रात मोडणाऱ्या राजापूर तालुक्यातील तीन व लांजा तालुक्यातील तीन अशा सहा गावांचे शासनाच्या वतीने कायमस्वरूपी स्थलांतर करून तेथील जनतेचे पुर्नवसन करण्याचा निर्णय शासनाच्या वतीने घेण्यात आला असून त्याबाबत कार्यवाही हाती घेण्यात आली आहे. तर राजापुरातील गाळ उपशामुळे काही प्रमाणात पुराचा धोका कमी झाल्याचे निदर्शनास आले असून भविष्यात राजापुरातील अर्जुना व कोदवली नद्या 100 टक्के गाळ मुक्त करून राजापूरकरांची पुराच्या संकटातुन कायमस्वरूपी सुटका करण्याचे नियोजन प्रशासनाच्या वतीने करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी बुधवारी राजापुरात दिली.
तर राजापुरातील पुररेषेचेही नव्याने सर्वेक्षण करण्याबाबत जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करून निर्णय घेतला जाईल असेही जिल्हाधिकारी यांनी यावेळी नमुद केले.
हवामान खात्याकडून जिल्ह्यात दोन दिवसांचा ‘रेड अलर्ट’ जाहीर करण्यात आला आहे. मंगळवार रात्रीपासून मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे राजापुरातील अर्जुना आणि कोदवली नद्यांना पूर आला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पार्श्वभूमिवर जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह हे जिल्हा पोलिस अधिक्षक धनंजय कुलकर्णी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी किर्ती किरण पुजार यांच्यासह बुधवारी दुपारी राजापुरात दाखल झाले. त्यांनी प्रांताधिकारी कार्यालयात राजापूर व लांजा तालुक्यातील नैसर्गिक आपत्तीबाबत आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी राजापूर शहरातील अर्जुना आणि कोदवली नद्यांना आलेल्या पुराची पहाणी केली. जवाहर चौक व परिसरात भेट देत त्यांनी पहाणी केली.
त्यानंतर जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह व सर्व अधिकारी यांनी धोपेश्वर गावातील दरडप्रवण क्षेत्राला भेट दिली व पहाणी केली.
राजापूरात जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी पत्रकारांशीही संवाद साधला. यावेळी त्यांनी जिल्हयातील एकूणच पुरपरिस्थितीचा सकाळीच मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी आपल्याकडून व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे आढावा घेतला आहे. जिल्हयातील दरड प्रवण गावांतील ग्रामस्थांचे कायमस्वरूपी स्थलांतर करण्याबाबत आराखडा तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री यांनी दिले आहेत. तर पुरग्रस्त भागातील नद्यांचा गाळ काढून पुराचा धोका कमी कसा करता येईल यासाठीही नियोजन करण्याबाबत सुचना देण्यात आल्या आहेत. त्याप्रमाणे राजापुर तालुक्यातील धोपेश्वर खंडेवाडी, वडदहसोळ हळदीची फांदी व परूळे पाटील वाडीतील पाच घरे हा दरडप्रवण क्षेत्रात येणाराअत्यंत धोकादायक भाग आहे. तर लांजा तालुक्यातील खोरनिनको मुसळेवाडी, इंदवटी बाईतवाडी व वनगुळे या गावांचा समावेश आहे. या सहा गावांतील ग्रामस्थांचे कायमस्वरूपी स्थलांतर करण्याचा निर्णय घेण्यात आला असून तसा प्रस्ताव शासनाकडे पाठविला जाणार असल्याचे जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी सांगितले. राजापुरातील धोपेश्वर गावातील दरडप्रवण खंडेवाडी, गुरववाडी व नाडणकरवाडी या ठीकाणी प्रत्यक्ष भेट देऊन जिल्हाधिकारी यांनी पहाणी केली व ग्रामस्थांशी संवाद साधला. अतिवृष्टी काळात ग्रामस्थांनी या ठीकाणी राहू नये प्रशासनाने व्यवस्था केलेल्या जागेत तात्पुरते स्थलांतरीत व्हावे असे सांगितले. तर पुर्नवसनाबाबतही माहिती दिली.
राजापुरातील अर्जुना व कोदवली नद्यांतील गाळ उपशामुळे काही प्रमाणात पुराचा धोका कमी झाला आहे. जर 100 टक्के गाळ उपसला तर हा धोका कायमचा टळणार आहे. याबाबतही शासनाकडून प्रस्ताव पाठविण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. त्याचाही प्रस्ताव पाठवून राजापूरातील या दोन्ही नद्यांतील गाळ 100 टक्के उपसुन त्याची नदीपात्राबाहेर वाहतुक करून नद्या गाळ मुक्त करताना राजापूरकरांची पुरापासून कायमस्वरूपी मुक्तता करण्यासाठी प्रयत्न केले जातील अशी ग्वाही यावेळी जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी दिली.
पुराचा कमी झालेला धोका, गाळ उपशानंतर भविष्यात पुराचा कमी होणारा धोका याचा विचार करता राजापूर शहरावर लादण्यात आलेली अन्यायकारक पुररेषा दूर करावी, त्याचे पुर्नसर्वेक्षण करावे अशी मागणी ज्येष्ठ पत्रकार महेश शिवलकर यांनी केली. यावर याबाबतही आपले प्रयत्न सुरू असून जलसंपदा विभागाची बैठकही आयोजित केल्याची माहीती त्यांनी यावेळी दिली.
याप्रसंगी प्रांताधिकारी वैशाली माने, तहसीलदार सौ. शीतल जाधव, लांजा तहसीलदार प्रमोद कदम, राजापूर मुख्याधिकारी प्रशांत भोसले, गटविकास अधिकारी विवेक गुंडपाटील आदींसह सर्व अधिकारी यावेळी उपस्थित होते.











