शिवसेना तालुका प्रमुख अशफाक हाजू यांची माहिती
ग्रामीण भागातील प्रलंबीत विकासकामांसाठी निधी देणार
राजापूर | प्रतिनिधी : राजापूर शहरासह ग्रामीण भागातील विविध रस्ते व अन्य विकास कामांसाठी जिल्हा वार्षिक योजना, नगरोत्थान व डोंगरी विकास कार्यक्रमांतर्गत पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी सुमारे सात कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याची माहिती शिवसेना तालुका प्रमुख अशफाक हाजू यांनी दिली आहे.
तालुक्यातील सहाही जिल्हा परिषद व त्यातील बारा पंचायत समित गणांतर्गत प्रलंबीत विकास कामांची यादी ना. सामंत यांनी मागविली असून या सर्व भागात प्रलंबीत विकास कामांसाठी त्या भागातील ग्रामस्थांच्या मागणीनुसार कामांना निधी उपलब्ध करून दिला जाणार असल्याचेही हाजू यांनी सांगितले. हा सात कोटींचा निधी हा या ठराविक वर्गाखाली उपलब्ध झाला असून ना. सामंत यांनी शासनाच्या अन्य योजनांमधून व अर्थसंकल्पातुन तालुक्याच्या विकासासाठी मोठया प्रमाणावर निधी उपलब्ध केल्याचे हाजू यांनी सांगितले.
राजापूर शहरात सुमारे सव्वातीन कोटीचा निधी ना. सामंत यांनी दिला आहे. यामध्ये शहरातील मुख्य रस्त्याच्या बीबीएमसाठी 70 लाख, भटाळी येथील सरंक्षण भित बांधकामासाठी 30 लाख, प्रभाग क्रमांक आठ मध्ये विविध विकास कामांसाठी 70 लाख तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन सुशोभिकरणासाठी 75 लाखाचा तर शहरातील अर्जुना नदीतील गाळ उपशासाठी 75 लाखाचा निधी ना. सामंत यांनी दिला आहे. नगरोत्थान, रस्ते अनुदानातुन हा निधी दिला आहे. तर तालुक्याच्या ग्रामीण भागात सुमारे साडेतीन ते चार कोटींचा निधी विविध विकास कामांसाठी ना. सामंत यांनी दिला असल्याचे हाजू यांनी सांगितले.
भविष्यात तालुक्याच्या सर्वांगिण विकासासाठी तालुक्यातील ग्रामीण भागातील तातडीच्या आणि स्थानिक जनतेची मागणी असलेल्या विकास कामांना निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही ना. सामंत यांनी दिली आहे. त्याबाबतचा आराखडा केला जाणार असून सर्व विकास कामांना ना. सामंत हे न्याय देणार असल्याचे हाजू यांनी सांगितले. तर लवकरच राजापुरात जनता दरबाराचेही आयोजन केले जाणार असल्याचेही हाजू यांनी सांगितले.












