राजापुरात महायुतीचाच विजयाचा गुलाल एकहाती सत्ता काबीज

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सर्वच्या सर्व जागा जिंकत रचला इतिहास
उबाठा शिवसेनेसह काँग्रेस, राष्ट्रवादी श. प. गट व मनसेचा सुफडा साफ
राजापूर (प्रतिनिधी): सुमारे चार वर्षांच्या प्रशासकीय कालावधीनंतर झालेल्या राजापूर तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत शिवसेना भाजपा महायुतीने भरभरून यश संपादन केले आहे. या निवडणुकीत आमदार किरण सामंत यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषदेच्या सहा पैकी सहा जागा जिंकत पंचायत समितीच्या बाराही जागांवर महायुतीने विजय मिळविला आहे. पंचायत समितीच्या १३ जागांपैकी शिवसेनेने १0, भाजपा १, व शिवसेना पुरस्कृत अपक्ष १ असे शंभर टक्के यश संपादन करत तालुक्यावरील आपले एक हाती वर्चस्व सिध्द केले आहे. या निवडणुकीत उबाठा शिवसेना आणि काँग्रेसचा सुफडा साफ झाला आहे. या अभूतपुर्व विजयानंतर महायुतीच्या कार्यकर्त्यांनी विजयाचा एकच जल्लोष साजरा केला.
नगर परिषद निवडणूकील पराभवाचा वचपा शिवसेनेने या निवडणूकीत काढला असून ग्रामीण भागातील आपले वर्चस्व या निकालाने सिध्द केले आहे.
  तालुक्यातील सहा जिल्हा परिषद गट व बारा पंचायत समितीच्या गणांसाठी सोमवारी हातिवले येथील आबासाहेब मराठे महाविद्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. जॅसमिन व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विकास गंबरे यांच्या उपस्थितीत मतमोजणी झाली. सुरूवातीपासूनच सर्वच जिल्हा परिषद व पंचायत समिती गणात शिवसेना उमेदवारांनी आघाडी घेत विजय संपादन केला. सर्वात लक्षवेधी ठरलेल्या धोपेश्वर पंचायत समिती गणात अखेरच्या फेरीपर्यंत महायुतीचे भाजपाचे उमेदवार अभिजित गुरव व अपक्ष शिवसेना पुरस्कृत योगेश नकाशे यांच्यात कडवी झुंझ पहावयास मिळाली. अखेर या लढतीत महायुतीचे भाजपाचे उमेदवार अभिजित गुरव यांनी बाजी मारली. तर अशाच प्रकारे नाटे पंचायत समिती गणातही महायुतीचे भाजपाचे उमेदवार सुवर्णा बांदकर व शिवसेना पुरस्कृत अपक्ष उमेदवार नंदीनी कदम यांच्यात झालेल्या अटीतटीच्या लढतीत शेवटच्या मतमोजणीत नंदीनी कदम यांनी अवघ्या १५ मतांनी विजय मिळविला.
या निवडणूकीत शिवसेना उबाठा, काँग्रेस व राष्ट्रवादी शरदपवार गटाचा सुपडा साफ झाला आहे. यापुर्वी शिवसेनेचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या राजापुर तालुक्यावर शिवसेना फुटीनंतर झालेल्या या निवडणूकीत आ. सामंत यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा हा शिवसेनेचाच बालेकिल्ला असल्याचे या विजयामुळे सिध्द झाले आहे. या निवडणूकीत काँग्रेस पक्षाने दोन पंचायत समिती गणातील जागा लढविल्या होत्या. या दोन्ही ठिकाणी काँग्रेसला दारूण पराभव पत्करावा लागला आहे. तर मनसेने एक जागा लढविली होती, या ठिकाणीही मनसेला पराभव पत्करावा लागला आहे. तर या निवडणूकीत अपक्षांचा फारसा प्रभाव दिसून आला नाही.
सकाळी १० वाजता मतमोजणीला प्रारंभ झाला, मात्र राजापुरात निकाल उशीराने जाहिर होत होते, सायंकाळी ५.३० पर्यंत अंतिम निकाल जाहिर झाले. या निवडणूकीत तालुक्यातील ३१ मतदान केंद्रावर मतदानाच्या दिवशी ईव्हीएम बंद पडले होते. त्यामुळे मतमोजणीवेळी या बंद पडलेल्या व मतदान झालेल्या ईव्हीएम मशिनमधील मते मोजण्यास विलंब लागत असल्याने मतमोजणीला विलंब झाल्याचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विकास गंबरे यांनी सांगितले.
प्रारंभी पोष्टल मतमोजणी हाती घेण्यात आली. त्यानंतर ईव्हीएम मशिनमधील मतमोजणीला प्रारंभ झाला. एकाच वेळी जिल्हा परिषद गटासह त्यातील दोन्ही पंचायत समिती गणांतील मतमोजणी करण्यात आली. धोपेश्वर गट व गणातील मतमोजणी दहा फेऱ्यांमध्ये तर अन्य गट व गणांतील मतमोजणी आठ ते नऊ फेऱ्यांमध्ये झाली.
राजापुरात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीत महायुतीने घवघवीत यश मिळविल्यानंतर विजयी उमेदवारांचे आमदार किरण सामंत, तालुका अध्यक्ष दीपक नागले, भाजपाचे एड. दीपक पटवर्धन, भाजपा तालुका अध्यक्ष मोहन घुमे, एड. एकनाथ मोंडे यांसह अनेक पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले. या विजयानंतर महायुतीकडुन एकच जल्लोष करण्यात आला. तर या विजयानंतर विजयी उमेदवारांनी राजापुरात येत जवाहर चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळयाला पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले.
जिल्हा परिषदेत सहा तर पंचायत समितीत दहा नवीन चेहरे
राजापुरातील या निवडणूकीत जिल्हा परिषदेच्या सहाही गणांतुन विजयी झालेले प्रतिक मटकर, सिध्दाली मोरे, कोमल नवाळे, सोनाली ठुकरूल, प्रकाश कुवळेकर व रमेश सुद हे प्रथमच जिल्हा परिषदेवर निवडून गेले आहेत. प्रतिक मटकर, सिध्दाली मोरे व प्रकाश कुवळेकर यांनी यापुर्वी पंचायत समिती सदस्य म्हणून काम केलेले आहे.
तर पंचायत समितीत भाग्यश्री लाड व उमेश पराडकर हे दुसऱ्यांदा निवडून आले असून उर्वरित गौतम जाधव, स्पृहा गुरव, राजेश गुरव, अभिजित गुरव, जान्हवी गावकर, पंढरीनाथ मयेकर, प्रसाद मोहरकर, समिक्षा वाफेलकर, अपेक्षा मासये, नंदीनी कदम यांनी प्रथमच पंचायत समिती सभागृहात प्रवेश केला आहे.
उबाठाचे वडदहसोळ पं. स. गणाचे उमेदवार विनोद शिंदे यांची प्रकृती बिघडली
राजापुरात मतमोजणी सुरू झाल्यानंतर पहिल्या फेरीच्या निकालानंतर उबाठाचे वडदहसोळ पं. स. गणाचे उमेदवार विनोद शिंदे यांची प्रकृती बिघडली. त्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास होऊ लागल्याने तात्काळ त्यांना रूग्णवाहिकेने राजापुर ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले. या निवडणूकीत वडदहसोळ पं. स. गणातुन शिंदे यांचा शिवसेनेचे गौतम जाधव यांनी पराभव केला आहे.
चोख पोलीस बंदोबस्त
या निवडणूकीच्या मतमोजणीच्या पार्श्वभूमिवर पोलीस उपअधिक्षक सुरेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली राजापूर पोलीस निरीक्षक अमित यादव, नाटे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या नेतृत्वाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
फोटो 9 आरजेपी 1।2।3।4
राजापूरात जि. प. आणि पं. स. च्या अभुतपुर्व विजयानंतर विजयी उमेदवारांसमवेत विजयोत्सव साजरा करताना आमदार किरण सामंत तर दुसऱ्या छायाचित्रात जुवाठी जि. प. गटातून विजयी झालेल्या रमेश सुद यांचे अभिनंदन करताना माजी राज्यमंत्री ल. र. हातणकर यांच्या पत्नी माई हातणकर सोबत त्यांची मुलगी व आमदार किरण सामंत. तर शेवटच्या छायाचित्रात विजयानंतर विजयाची खूण करताना महायुतीचे उमेदवार.
जि. प. गट विजयी उमेदवार:
वडदहसोळ- प्रतिक मटकर (शिवसेना)
तळवडे- सिध्दाली मोरे (शिवसेना)
साखरीनाटे- कोमल नवाळे (शिवसेना)
कातळी- सोनाली ठुकरूल (शिवसेना)
धोपेश्वर- प्रकाश कुवळेकर (शिवसेना)
जुवाठी- रमेश सुद (शिवसेना)
पंचायत समिती गणांतील विजयी उमेदवार:
वडदहसोळ- गौतम जाधव (शिवसेना)
रायपाटण- उमेश पराडकर(शिवसेना)
साखरीनाटे- स्पृहा गुरव (शिवसेना)
अणसुरे- जान्हवी गावकर (शिवसेना)
कातळी- पंढरीनाथ मयेकर (शिवसेना)
जुवाठी- प्रसाद मोहरकर (शिवसेना)
केळवली- भाग्यश्री लाड (शिवसेना)
ताम्हाणे- समिक्षा वाफेलकर (शिवसेना)
तळवडे- अपेक्षा मासये (शिवसेना)
पेंडखळे- राजेश गुरव (शिवसेना)
धोपेश्वर- अभिजीत गुरव (भाजपा)
नाटे-नंदिनी कदम  (अपक्ष शिवसेना पुरस्कृत)
राजापुरातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निकाल आकडेवारी
वडदहसोळ जिल्हा परिषद गट
१) राजेश चव्हाण (उबाठा ) 3732
२) प्रतिक मटकर (शिवसेना) – 5287 विजयी
नोटा- 277
*
वडदहसोळ पंचायत समिती गण
१) गौतम जाधव (शिवसेना) -2581 विजयी
२) राजेश पवार (मनसे) –494
३) विनोद शिंदे (उबाठा ) -1706
नोटा- 112
*
रायपाटण पंचायत समिती गण
१) उमेश पराडकर (शिवसेना) -2742 विजयी
२) विश्वनाथ लाड (उबाठा) – 1528
नोटा- 133
————————————————————
राजापूर फेरीतील आकडेवारी
तळवडे जिल्हा परिषद गट
१) समिक्षा चव्हाण (उबाठा) -4136
२) सिद्धाली मोरे (शिवसेना) – 4595 विजयी
नोटा-231
*
तळवडे पंचायत समिती गण
१) अपेक्षा मासये, (शिवसेना) – 2526 विजयी
२) भामिनी सुतार, (उबाठा) – 2068
नोटा- 139
*
ताम्हाणे पंचायत समिती गण
१) योगी डांगे (उबाठा) – 1876
२) समिक्षा वाफेलकर (शिवसेना) 2219 विजयी
नोटा- 134
—————————————————————–
साखरीनाटे जिल्हा परिषद गट
१) कोमल नवाळे (शिवसेना ) – 6161 विजयी
२) नलिनी शेलार (उबाठा) – 4486
नोटा-260
*
साखरीनाटे पंचायत समिती गण
१) स्पृहा गुरव, (शिवसेना) -2739 विजयी
२) मिनाब म्हसकर (काँग्रेस) – 2396
नोटा- 143
*
नाटे पंचायत समिती गण
१) नमिता नागले (उबाठा) – 1778
२) सुवर्णा बांदकर (भाजपा) -1853
३) नंदिनी कदम (अपक्ष ) -1868 विजयी
नोटा- 130
—————————————————————
कातळी जिल्हा परिषद गट
१) सोनाली ठुकरूल (शिवसेना ) -5549 विजयी
२) लक्ष्मी शिवलकर (उबाठा) –3774
३) सावित्री कणेरी (अपक्ष ) -967
नोटा 130
*
अणसुरे पंचायत समिती गण
१) जान्हवी गावकर (शिवसेना) -2324 विजयी
२) दिपाली मेढेकर (उबाठा) –1796
३) सावित्री कणेरी (अपक्ष ) -509
नोटा- 122
**
कातळी पंचायत समिती गण
१) अजय कार्शिंगकर (उबाठा)  -2010
२) पंढरीनाथ मयेकर (शिवसेना)  – 2977 विजयी
३) बाळकृष्ण हळदणकर (अपक्ष ) -566
नोटा- 115
————————————————————–
धोपेश्वर जिल्हा परिषद गट
१) प्रकाश कुवळेकर (शिवसेना)-6094  विजयी
२) अभिजित तेली (उबाठा)-4897
नोटा-277
*
धोपेश्वर प. स. गण
१) अभिजीत गुरव (भाजपा)-2900 विजयी
२) कृष्णाजी नागरेकर (उबाठा) – 1087
३) सिध्देश मराठे (काँग्रेस) -133
४) योगेश नकाशे  (अपक्ष)-2649
नोटा-99
*
पेंडखळे प. स. गण
१) राजेश गुरव (शिवसेना)-2332 विजयी
२) गणेश बाईंग  (उबाठा)– 1897
३) प्रणाली माळी अपक्ष  -98
नोटा-74
—————————————————————–
जुवाठी जिल्हा परिषद गट
१) दिनेश जैतापकर (उबाठा) – 4144
२) रमेश सुद (शिवसेना ) – 5221 विजयी
नोटा- 246
*
जुवाठी पंचायत समिती गण
१) दिवाकर मयेकर (उबाठा) – 1597
२) प्रसाद मोहकर (शिवसेना) – 2519 विजयी
३) प्रकाश भिवंदे (अपक्ष ) -936
नोटा-77
**
केळवली पंचायत समिती गण
१) छाया कोकाटे (उबाठा) – 1854
२) भाग्यश्री लाड (शिवसेना)) -2467 विजयी
नोटा- 161
—————————————————————–