मंत्री उदय सामंत यांचे गौरवोद्गार
नाणीज .:- जगद्गुरु रामानंदचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेने केवळ पंधरा दिवसात १,७१,१५० बाटल्या रक्त संकलन झाले. यामुळे त्याच्या दहापट लोकांना जीवदान मिळाले ही मोठी अध्यात्मिक क्रांती आहे, असे गौरवोद्गार राज्याचे उद्योग मंत्री नामदार उदय सामंत यांनी आज येथे काढले..
नाणीज क्षेत्री आज रामानंदचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेतून अवघ्या पंधरा दिवसात १,७१,१५० बाटल्यांचे विक्रमी रक्त संकलन झाले. त्यानिमित या कार्यात योगदान दिलेल्यांचा प्रातिनिधिक गौरव आज पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी मंत्री बोलत होते. आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यावेळी उपस्थित होते.
मंत्री सामंत पुढे म्हणाले, “महाराष्ट्राच्या रक्तसंकलनाची जबाबदारी रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांनी घेतली आहे. एकाच्या ताकदीवर एवढे रक्त संकलन करण्याचा हा जागतिक विक्रम आहे. सामाजिक कामाचा गाडा हाताळण्याचा त्यांचा आदर्श घेण्यासारखा आहे. त्यामुळेच कोणतेही निमंत्रण नसताना लाखो भाविक येथे आले आहेत.”
ते म्हणाले, ” शासनाची १०८ रुग्णवाहिकेच्या अगोदर नरेंद्राचार्यजींची रुग्णवाहिका अपघातस्थळी पोहोचते. केवळ कळले तरी ती काही मिनिटात घटनास्थळी जाते. या सिस्टिमचा अभ्यास शासनानेही करावा. कारण शासन मंत्रालयातून जे करते ते काम तुम्ही या पिठातून प्रभावीपणे करता.”
रक्तदान यज्ञाने
इतिहास घडवला
– मंत्री आबिटकर
आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या कार्याचा गौरव केला. ते म्हणाले, ” जगद्गुरु यांच्या रक्तदान यज्ञाने इतिहास घडवला आहे. त्यांच्या या रक्तदान चळवळीमागेआध्यात्मिक अधिष्ठान आहे. रक्तदान, देहदान, अवयवदानाच्या माध्यमातून आरोग्य विभागाचे काम जगद्गुरु प्रभावीपणे करीत आहेत. त्यांचा सामाजिक, धार्मिक, आध्यात्मिक कामातील पुढाकार महत्त्वाचा आहे. सर्व कार्याला माझ्या शुभेच्छा!”
जिल्हाधिकारी मनोज जिंदाल यांनी जगद्गुरु नरेंद्राचार्यजी यांच्या कार्याचा गौरव केला. जगद्गुरु हे उत्तम मॅनेजमेंट गुरु आहेत, असे ते म्हणाले.
परमपूज्य कानिफनाथ महाराज म्हणाले की,” हा आमच्या कार्याचा, गरिबांच्या उद्धाराचा यज्ञ आता थांबणार नाही.”
यावेळी आमदार शेखर निकम, आमदार भय्याशेठ उर्फ किरण सामंत, अभिनेते आनंद कारेकर, रक्त संकलन परिषदेचे डॉ. पुरुषोत्तम पुरी, तहसीलदार राजाराम म्हात्रे, जिल्हा शल्य चिकित्सक. डॉ.बी व्ही जगताप,पं. स.सदस्य डॉ. पद्मजा कांबळे, सरपंच विनायक शिवगण, या सहित अनेक मान्यवर उपस्थित होते..










