कशेडी घाटात बर्निग कारचा थरार

खेड : मुंबई – गोवा महामार्गावर कशेडी घाटात बुधवारी ३ मे रोजी दुपारी १२.३० च्या सुमारास मुंबईच्या दिशेने जाणार्या कारने अचानक पेट घेतला. मात्र प्रवासी वेळेत खाली उतरल्याने अनर्थ टळला. या कारमधून विष्णू सर्जेराव गरजे (रा. नवी मुंबई कोपरखैरणे) पत्नी प्रतिभा विष्णू गरजे आदीसह ८ जण प्रवास करत होते.

कशेडी घाटातील स्वामी समर्थ मठाच्या खालील बाजूस गणपतीपुळेहून ते मुंबईच्या दिशेने जाणार्या कारच्या ( एमएच४३/ई डबल्यू/०७१०) इंजिनमधून अचानक धूर येऊ लागला. कारच्या बोनेटमधून धूर येऊ लागल्याने कार रस्त्याच्या बाजूला घेण्यात आली. कारमधील सर्वजण सुखरूपपणे बाहेर पडली. त्याचवेळी कारने पेट घेतला. यात संपूर्ण कार जळून खाक झाली. या घटनेची माहिती खेड नगरपरिषदेच्या अग्निशमन दल आणि खेड पोलीस ठाण्याला देण्यात आली. त्यानंतर प्रभारी सहायक पोलीस निरिक्षक सुजित गडदे कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले.