आमदार किरण सामंत यांचे नेतृत्व सिध्द
ग्रामीण भागात धोपेश्वर गणात भाजपाचे कमल फुलले
राजापूर प्रतिनिधी: सोमवारी तालुक्यातील सहा जिल्हा परिषद गट व बारा पंचायत समिती गणांचे निकाल जाहिर झाले. या निकालात शिवसेना भाजपा महायुतीने १०० टक्के घवघवीत यश मिळवत बाजी मारली आहे. या निवडणूकीत अस्तीत्वासाठी झगडणाऱ्या उबाठा शिवसेनेचा दारूण पराभव झाला आहे. काही गट व गणांमध्ये उबाठाने चांगली लढत देण्याचा प्रयत्न केला, मात्र अखेर महायुतीने बाजी मारत जिल्हा परिषदेच्या सहा पैकी सहा जागा तर पंचायत समितीच्या बाराही जागा जिंकत निर्वीवाद यश संपादन केले आहे. नगर परिषदेतील निवडणूकीत झालेल्या पराभवानंतर शिवसेनेने आणि खास करून आमदार किरण सामंत यांनी या निवडणूकीत ग्रामीण भागात आपले वर्चस्व प्रस्थापित करत आपले नेतृत्व सिध्द केले आहे. या निवडणूकीत धोपेश्वर पंचायत समिती गणात भाजपा उमेवार अभिजित गुरव यांच्या विजयाने ग्रामीण भागात भाजपाचे कमळ फुलले आहे.
राजापुरात जिल्हा परिषदेच्या सहा व पंचायत समितीच्या बारा जागांसाठी निवडणूक झाली. यासाठी तब्बल ४५ उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात होते. यामध्ये जिल्हा परिषदेच्या सहा जागांसाठी १३ तर पंचायत समितीच्या १२ जागांसाठी ३२ उमेदवार रिंगणात होते. शनिवारी ७ फेब्रुवारीला यासाठी मतदान झाले होते. एकूणच निवडणूकांच्या तुलनेत या निवडणूकीत केवळ ५० टक्के इतकेच मतदान झाले होते. त्यामुळे मतदानाचा घसरलेला टक्का कोणाला धक्का देणार याबाबत उत्सुकता होती.
अखेर सोमवारी जाहिर झालेल्या निकालात महायुतीने घवघवीत यश मिळविले आहे. जिल्हा परिषदेच्या सहा पैकी सहा जागा शिवसेनेने जिंकल्या आहेत. तर पंचायत समितीच्या बारा पैकी दहा जागी शिवसेनेने, एका जागी भाजपाने तर एका जागी शिवसेना पुरस्कृत अपक्ष उमेदवार विजयी झाला आहे. त्यामुळे पंचायत समितीतही महायुतीने १०० टक्के यश मिळविले आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
शिवसेनेच्या फुटीनंतर ही निवडणूक झाली. राजापूर नगर परिषदेच्या निवडणूकीत नगराध्यक्षपदासह दहा नगरसेवक पदाच्या जागा जिंकत महाविकास आघाडीने बाजी मारली होती. त्यामुळे या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकांकडे राजापूर वासीयांचे लक्ष लागून राहिले होते. राजापुरात शिवसेना, भाजपा व मित्र पक्षांनी महायुती करत ही निवडणूक लढविली होती. मात्र धोपेश्ववर व नाटे पंचायत समिती गणातील या दोन जागा महायुतीत भाजपाला सोडण्यात आल्या होत्या. मात्र निवडणूक प्रचारात या दोन्ही ठिकाणी अपक्ष उमेदवारांना शिवसेनेने पाठींबा देत पुरस्कृत केले होते, त्यामुळे महायुतीत तणाव निर्माण झाला होता. त्यामुळे या ठिकाणी काय होणार याबाबतही उत्सुकता होती.
सोमवारी जाहिर झालेल्या निकालात धोपेश्वर पंचायत समिती गणातुन भाजपाचे अभिजित गुरव यांनी बाजी मारत शिवसेना पुरस्कृत अपक्ष उमेदवार योगेश नकाशे यांचा पराभव केला. तर नाटे गणात भाजपाच्या सुवर्णा बांदकर यांनी शिवसेना पुरस्कृत अपक्ष उमेदवार नंदीनी कदम यांना कडवी टक्कर दिली. यात बांदकर यांचा अवघ्या १५ मतांनी पराभव झाला. भाजपाकडून या दोन्ही उमेदवारांच्या विजयासाठी परिश्रम घेण्यात आले. बाकी सर्व जिल्हा परिषद व पंचायत समिती गट व गणांमध्ये महायुतीने एकहाती विजय मिळविला आहे.
आमदार किरण सामंत यांनी या निवडणूकीत नियोजनबध्द प्रचार यंत्रणा राबवत कमी कालावधीत मतदारांपर्यंत पोहचत महायुतीच्या विजयात महत्वाची भूमिका बजावली आहे. या विजयाने आ. सामंत यांनी नगर परिषदेतील पराभवाचा वचपा काढला आहे.
या निवडणूकीत उबाठा शिवसेना गटाकडून आहे त्या परिस्थितीत सर्व जागा लढवत आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. काही गट व गणांमध्ये उबाठा गटाच्या उमेदवारांनी चांगली लढत दिली. मात्र या निवडणूकीत एकही जागा उबाठाला जिंकता आलेली नाही. तर काँग्रेसससह राष्ट्रवादी शरद पवार गटही या निवडणूकीत निष्प्रभ ठरला आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीतील या विजयानंतर आता आ. किरण सामंत यांची व महायुतीचे पदाधिकारी यांची जबाबदारी खऱ्या अर्थाने वाढली आहे. आता ग्रामीण भागातील जनतेच्या विकासाला व विकास कामांना गती देण्याचे आव्हान त्यांना पेलावे लागणार आहे. तर तब्बल चार वर्षांनी प्रशासकिय राजवट संपुष्टात येऊन लोकप्रतिनिधींचा कारभार सुरू होणार असल्याने व त्यातही महायुतीची एकहाती सत्ता आल्याने तालुक्यातील जनतेच्याही अपेक्षा वाढल्या आहेत. या अपेक्षांची पुर्तता कशी होते हे आगामी काळच ठरविणार आहे. मात्र ग्रामीण भागातील जनतेने पुन्हा एकदा शिवसेनेला साथ दिल्याचे या निकालांती स्पष्ट झाले आहे. तर आ. किरण सामंत यांनी वर्षभरात राजापूरवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे एवढे मात्र नक्की.













