मळगाव-सोनुर्ली भागात रेल्वे ट्रॅकवर आढळला अज्ञात तरुणाचा मृतदेह

धावत्या रेल्वेतून पडल्याचा प्राथमिक अंदाज

​सावंतवाडी । प्रतिनिधी :
कोकण रेल्वे मार्गावर मळगाव ते सोनुर्ली दरम्यान रेल्वे ट्रॅक दरम्यान असलेल्या वेत्ये पुलाजवळ एका अज्ञात तरुणाचा रेल्वेतून पडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. २५ ते ३० वयोगटातील या तरुणाची अद्याप ओळख पटलेली नसून, सावंतवाडी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

​ याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मळगाव आणि सोनुर्ली रेल्वे ट्रॅकच्या दरम्यान वेत्ये पुलाच्या अलीकडे एक मृतदेह पडल्याचे मंगळवारी सकाळी ६ वाजेच्या सुमारास स्थानिक ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. ही घटना सोमवार रात्री ते मंगळवार पहाटेच्या दरम्यान घडल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ग्रामस्थांनी तातडीने याची माहिती रेल्वे प्रशासन आणि पोलिसांना दिली.

या घटनेची खबर रेल्वेचे ट्रॅकमन राजन मोहन पारकर (रा. नेमळे, सावंतवाडी) यांनी सावंतवाडी पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह २५ ते ३० वर्ष वयोगटातील एका तरुणाचा असून, त्याच्या अंगावर नक्षीकाम केलेला शर्ट आहे. तो धावत्या रेल्वेतून खाली पडल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. मात्र, उशिरापर्यंत या तरुणाचे नाव किंवा पत्ता समजू शकलेला नाही.

​सावंतवाडी पोलीस ठाण्यात याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक लोहकरे आणि पोलीस हवालदार महेश धोत्रे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. संबंधित तरुणाबाबत कोणास माहिती असल्यास सावंतवाडी पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.