आंगणेवाडी जत्रोत्सवात रस्ता सुरक्षा जनजागृती अभियान!

 ▪️उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, सिंधुदुर्ग यांच्याकडून आयोजन

मसुरे | झुंजार पेडणेकर :   सुरक्षित व शिस्तबद्ध प्रवासासाठी रस्ता सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काळे यांनी येथे केले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आंगणेवाडी श्री भराडी देवीच्या जत्रोत्सवानिमित्त उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, सिंधुदुर्ग यांच्यावतीने रस्ता सुरक्षा विषयक जनजागृती उपक्रम राबविण्यात आले. जत्रोत्सवासाठी आलेल्या भाविकांमध्ये सुरक्षित प्रवासाबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता.

या उपक्रमांतर्गत उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून विशेष चित्ररथ व LED स्क्रीनची व्यवस्था करण्यात आली होती. या माध्यमातून रस्ता सुरक्षा नियम, हेल्मेट व सीटबेल्टचा वापर, वेगमर्यादा पाळणे, मद्यपान करून वाहन न चालवणे आदी विषयांवर माहिती देण्यात आली. तसेच भाविकांना रस्ता सुरक्षा विषयक माहितीपत्रिकांचे वाटप करून सुरक्षित वाहनचालना संदर्भात सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

या प्रसंगी सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी आशिष लोकरे, मोटार वाहन निरीक्षक रत्नकांत ढोबळे, संकेत सोमणाचे, अमित पाटील, अमित नायकवाडी उपस्थित होते. तसेच चालक लहू वाळके, सचिन सावंत, रामदास पाखरे यांनीही उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी सहकार्य केले.

उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, सिंधुदुर्ग यांच्या या उपक्रमामुळे भाविकांमध्ये रस्ता सुरक्षेबाबत सकारात्मक जनजागृती निर्माण झाली असून सुरक्षित प्रवासाचा संदेश प्रभावीपणे जनमानसापर्यंत पोहोचला.