रत्नागिरी : प्रतिनिधी रत्नागिरी जिल्हा सहकारी आंबा उत्पादक संघामार्फत १० फेब्रुवारी रोजी ‘ड्रीप इरिगेशन’ आणि ‘सघन आंबा लागवड’ या विषयावर एक विशेष कार्यशाळा उत्साहात पार पडली. या कार्यशाळेत आधुनिक तंत्रज्ञान, शासकीय योजना आणि खत नियोजनाबाबत तज्ज्ञांनी उपस्थित सुमारे १५० शेतकऱ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी आमदार श्री. किरणजी सामंत यांचे विशेष सहकार्य लाभले.
ड्रीप इरिगेशन आणि खत नियोजनावर भर
जैन इरिगेशनचे श्री. गाडेकर यांनी ड्रीप इरिगेशनचे महत्त्व विशद केले. बागेला वर्षभर ड्रीपमधून देण्यात येणाऱ्या खतांचे नियोजन (Fertigation) आणि सघन आंबा लागवडीच्या फायद्यांवर त्यांनी सविस्तर चर्चा केली. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांच्या विविध शंकांचे त्यांनी निरसन केले. दापोली कृषी विद्यापीठाचे डॉ. श्री. किरण माळशे यांनीदेखील आंबा पिकाच्या शास्त्रीय व्यवस्थापनाबाबत तांत्रिक मार्गदर्शन केले.
शासकीय योजना आणि AI ॲपची माहिती
जिल्हा कृषी अधिकारी श्री. सदाफुले यांनी राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध कृषी योजनांची माहिती देऊन शेतकऱ्यांना लाभ घेण्याचे आवाहन केले. विशेष म्हणजे, कृषी विभागाने AI (Artificial Intelligence) चा वापर करून तयार केलेल्या नवीन मोबाईल ॲपची माहिती त्यांनी दिली आणि शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडले जाण्यासाठी हे ॲप वापरण्यास उद्युक्त केले. या कार्यशाळेसाठी जिल्हा कृषी कार्यालयाचे विशेष सहकार्य लाभले.
नवनवीन उत्पादनांचे सादरीकरण
कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक ‘श्राईन इसुझु’ यांनी इसुझु गाड्यांची वैशिष्ट्ये शेतकऱ्यांना सांगितली. ‘वेदा प्लास्टिक’तर्फे आंबा वाहतुकीसाठीच्या आधुनिक क्रेट्सचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले, तर ‘राघव पॅकेजिंग’च्या श्री. मराठे यांनी स्वस्त आणि दर्जेदार कोरुगेटेड बॉक्सचे विविध नमुने सादर केले.
शेतकऱ्यांचा उत्साह
कार्यक्रमाच्या सुरुवातीला आंबा संघाचे प्रसन्न पेठे आणि अल्ताफ काझी यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. ज्येष्ठ शेतकरी उदय पटवर्धन यांनी या वयातही नवीन तंत्रज्ञान शिकण्याची जिद्द दाखवून उपस्थित तरुणांसमोर एक आदर्श ठेवला. कार्यक्रमाची सांगता मंदार सरपोतदार यांनी आभार प्रदर्शनाने केली.











