सावंतवाडी मतदारसंघात निवडणुकीत पैशांचा पेटलेला वणवा लोकशाहीला घातक : आ. दीपक केसरकर

वरिष्ठांचे लक्ष वेधणार : पराभवाने खचून न जाता संघटनेसाठी काम करा

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतील विजयी उमेदवारांचा सत्कार

​सावंतवाडी । प्रतिनिधी : जिल्हा परिषद निवडणूकीत सावंतवाडी मतदारसंघात अपक्ष उमेदवारांसाठी ज्या प्रकारे पैशांचा वणवा पेटवण्यात आला, तो प्रकार लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे. लोकशाहीत पैशांचा असा वारेमाप वापर होणे ही चिंतेची बाब आहे. हे प्रकार नेमके कोणी केले, याची सखोल माहिती घेऊन आपण यासंदर्भात वरिष्ठांचे लक्ष वेधणार असल्याचे आमदार दीपक केसरकर यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्ह्यात महायुतीला मिळालेले यश हे अत्यंत आनंददायी असल्याचे सांगत, आगामी काळात संघटन अधिक मजबूत करण्यावर आपला भर असेल असे त्यांनी स्पष्ट केले.

सावंतवाडी येथील आपल्या कार्यालयात नवनिर्वाचित जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांच्या सत्कार समारंभात ते बोलत होते. ते म्हणाले, या निवडणुकीत काही उमेदवारांचा थोडक्या मतांनी पराभव झाला, मात्र त्यांनी खचून जाण्याचे कारण नाही. पराभूत उमेदवारांनी निराश न होता संघटनेसाठी अधिक जोमाने काम करत राहावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

या सोहळ्यात न्हावेली पंचायत समिती गणाचे नवनिर्वाचित सदस्य शरद धाऊसकर यांच्यासह इतर विजयी उमेदवारांचा आमदार केसरकर यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींना मार्गदर्शन करताना ते म्हणाले की, जनतेने ज्या विश्वासाने तुम्हाला कौल दिला आहे, तो सार्थ ठरवण्यासाठी आतापासूनच कामाला लागा. लोकांच्या अडीअडचणी समजून घेऊन त्यांची कामे मार्गी लावणे ही तुमची प्राथमिक जबाबदारी आहे. या विकासकामांसाठी आवश्यक असलेल्या निधीची कोणतीही कमतरता पडू दिली जाणार नाही, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

​ या सत्कार सोहळ्याला जिल्हाप्रमुख संजू परब, सचिन वालावलकर, प्रेमानंद देसाई, गणेशप्रसाद गवस यांसह शिवसेनेचे इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.