राजापूर: बेनगी-आडीवरे सड्यावर भीषण वणवा; आंबा-काजू बागांचे लाखो रुपयांचे नुकसान

राजापूर | प्रतिनिधी : तालुक्यातील बेनगी, आडीवरे परिसरामध्ये आज दुपारच्यावेळी सड्यावर वणवा लागल्याची घटना घडली. दुपारच्या रखरखत्या ऊनामध्ये भडकलेल्या आगीला वार्‍याची साथ मिळून वणव्याचा चांगलाच भडका उडाला होता. शेतकर्‍यांसह ग्रामस्थांनी आग आटोक्यात आणण्याचे शर्थीचे केलेले प्रयत्न अपुरे ठरले. त्यानंतर, मागविण्यात आलेल्या राजापूर नगर पालिकेच्या अग्नीशमन बंबाच्या सहाय्याने आग विझविण्याच्या सुरू करण्यात आलेल्या प्रयत्नांना यश येवून वणवा आटोक्यात आला. मात्र, सुमारे तीन-साडेतीन तास पेटलेल्या या वणव्यामध्ये या परिसरातील बागेतील फळांनी लगडलेली आंबा-काजूची झाडे जळून शेतकर्‍यांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे.

बेनगी, आडीवरे येथे आज दुपारी अचानक लागलेल्या वणव्यामध्ये या परिसरातील आंबा-काजू बागांमधील झाडे जळून नुकसान झाले आहे. सड्यावरील गुरांना वैरणासाठी उपयुक्त ठरणारे गवतही जळून गेले असून ग्रामस्थ, राजापूर नगर पालिकेचा अग्नीशमन बंब याच्या सहाय्याने वणवा सध्या आटोक्यात आणण्यात यश आल्याची माहिती तलाठी स्वप्नील गराटे यांनी दिली. या वणव्यामध्ये झालेल्या नुकसानीचा पंचनामा करण्याचे काम सुरू असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
लोकवस्तीपासून दूर असलेल्या बेनगी परिसरातील सड्यावर वणवा लागल्याची माहिती काही ग्रामस्थांना मिळाली.

दुपारच्यावेळीवेळी लागलेल्या वणव्याचा चांगलाच भडका उडाला. त्यामध्ये काही शेतकर्‍यांच्या फळांनी लगडलेली आंबा-काजूची झाडे होरपळून गेली. दरम्यान, वणवा लागल्याची घटना कर्णोपर्णी होताच बागायतदारांसह ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत वणवा विझविण्याचे आटोकाट प्रयत्न केले. मात्र, वार्‍याच्या साथीने भडकणारा वणवा आटोक्यात येत नव्हता. दरम्यान, काहींनी नगर पालिकेशी संपर्क साधून आग विझवियासाठी अग्मीशमन बंबही बोलविला. त्यानंतर, थोड्या वेळामध्ये अग्मीशमन बंब दाखल होवून पाण्याचा फवारा मारून सुमारे तीन-साडेतीन तासाच्या कालावधीनंतर वणवा आटोक्यात आणण्यात सार्‍यांना यश आले. गेल्या काही वर्षामध्ये दिवाळीनंतर नोव्हेबर-डिसेंबर महिन्यामध्ये आणि त्यानंतर पुढे काही महिने सातत्याने वणवा लागण्याच्या घटना घडत आहेत. त्यामध्ये शेतकर्‍यांनी विकसित केलेल्या बागा, गवत जळून खाक होताना त्यांचे लाखो रूपयांचा नुकसान होते. त्यामुळे सातत्याने वणवा लागण्याच्या घडणार्‍या घटनांबबत बागायतदारांसह शेतकर्‍यांमधून चिंता व्यक्त केली जात आहे.