पक्षी मारण्याच्या बंदुकीचा ट्रिगर दाबल्याने तरुणी गंभीर जखमी; संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल

गुहागर प्रतिनिधी: 
तालुक्यातील वेळंब पिंपळवाडी येथे एका तरुणाच्या निष्काळजीपणामुळे २१ वर्षीय तरुणी गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. पक्षी मारण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या बंदुकीचा ट्रिगर अचानक दाबला गेल्याने त्यातील छरा लागून ही दुर्घटना घडली. याप्रकरणी गुहागर पोलिसांनी संबंधित तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी मयुरी सखाराम पिंपळे (वय २१) ही शनिवार, ७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास आपल्या राहत्या घरातील बेडरूममध्ये मोबाईलचा चार्जर शोधत होती. त्याचवेळी अल्पेश अनंत पिंपळे (वय २८) हा तिच्या पाठीमागून आला. त्याच्या हातात पक्षी मारण्याची बंदूक होती.

बंदूक हाताळत असताना अल्पेश याच्याकडून निष्काळजीपणे ट्रिगर दाबला गेल्याने बंदुकीतील छरे थेट मयुरीच्या डाव्या खांद्याला लागले व शरीरात घुसले. या घटनेत ती गंभीर जखमी झाली.

घटनेनंतर मयुरी पिंपळे हिने दिलेल्या तक्रारीवरून संशयित अल्पेश अनंत पिंपळे याच्याविरुद्ध गुहागर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १२५ (ब) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास गुहागर पोलीस करीत आहेत.