​गड किल्ले प्रतिकृती स्पर्धेत आबलोलीच्या चंद्रकांत बाईत विद्यालयाचा जिल्ह्यात डंका;

आबलोली (वार्ताहर):
रत्नागिरी जिल्हा विज्ञान मंडळ आणि माध्यमिक शिक्षण विभाग, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय ‘गड किल्ले प्रतिकृती निर्मिती’ स्पर्धेत गुहागर तालुक्यातील चंद्रकांत बाईत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, आबलोली या विद्यालयाने नेत्रदीपक यश संपादन केले आहे. या स्पर्धेत विद्यालयाच्या प्रतिकृतीने संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात द्वितीय क्रमांक पटकावून विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

​जिल्हास्तरावरील या अटीतटीच्या स्पर्धेत बाजी मारल्याबद्दल विद्यार्थ्यांना ७,५०० /- रुपये रोख आणि सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. महाराष्ट्राचा वैभवशाली इतिहास आणि गडकिल्ल्यांची स्थापत्यशैली विद्यार्थ्यांनी आपल्या प्रतिकृतीतून हुबेहूब साकारली होती, ज्याची परीक्षकांनी विशेष प्रशंसा केली.
​यशाचे मानकरी विद्यार्थी
​विद्यालयाच्या या यशात विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेने आणि मेहनतीने मोलाचे योगदान दिले आहे यामध्ये
कुमार प्रेयश प्रसाद पेडणेकर,
कुमार श्रेयस भरत डिंगणकर,
कुमार अद्वैत सुरेश ठोंबरे
​या विद्यार्थ्यांनी ऐतिहासिक किल्ल्याची प्रतिकृती अत्यंत बारकाव्यांसह तयार केली होती. या यशाबद्दल विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि ग्रामस्थांकडून विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे भरभरून कौतुक होत आहे.

लोक शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष सचिनशेठ बाईत व सर्व कार्यकारिणीने विद्यार्थ्यांचे कौतुक केले. विद्यार्थ्यांच्या या यशामुळे आबलोली परिसराचे नाव जिल्हास्तरावर उंचावले आहे.