मिठगवाणे गावातील जुने निष्ठावंत शिवसैनिक, माजी एसटी चालक बाळकृष्ण (बाळू) काजवे यांचे निधन

जैतापूर (वार्ताहर) : राजापूर तालुक्यातील मिठगवाणे गावाच्या सामाजिक व राजकीय पटलावर प्रदीर्घ काळ ठसा उमटवणारे जुने जाणते, खंबीर नेतृत्व आणि शिवसेनेचे निष्ठावंत कार्यकर्ते बाळकृष्ण (बाळू) काजवे यांचे सोमवार २६ ऑक्टोबर रोजी निधन झाले. सामाजिक कार्यकर्ते राजा काजवे यांचे ते काका होत.
त्यांच्या निधनाने संपूर्ण मिठगवाणे परिसरावर शोककळा पसरली असून, एका लढवय्या व जनसामान्यांशी नाळ जोडलेल्या व्यक्तिमत्त्वाला गाव पारखे झाल्याची भावना व्यक्त होत आहे.
बाळू काजवे यांनी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या राजापूर आगारात सलग अनेक वर्षे चालक म्हणून उल्लेखनीय आणि प्रामाणिक सेवा बजावली होती. एसटी सेवेच्या माध्यमातून त्यांनी प्रवाशांशी आणि सहकाऱ्यांशी आपुलकीचे संबंध जोडले होते.
नोकरीसोबतच समाजकारणाची ओढ असलेल्या काजवे यांनी मिठगवाणे गावामध्ये शिवसेनेची शाखा स्थापन करण्यामध्ये सिंहाचा वाटा उचलला होता. प्रतिकूल काळात पक्षाचे विचार घराघरांपर्यंत पोहोचवत त्यांनी गावात शिवसेनेची पाळेमुळे घट्ट रुजवली आणि संघटना बांधणीत मोलाची भूमिका बजावली. यासोबतच गावातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा अर्धपुतळा उभारण्यात त्यांचा पुढाकार व अत्यंत मोलाचे योगदान राहिले होते.
गावातील विविध नागरी प्रश्न, विकासाची कामे आणि सर्वसामान्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी ते कायम अग्रभागी असायचे. त्यांच्या स्पष्टवक्तेपणामुळे आणि निर्भीड कार्यशैलीमुळे अनेक नव्या कार्यकर्त्यांना प्रेरणा मिळाली. त्यांच्या जाण्याने परिसरातील सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय क्षेत्राची कधीही भरून न निघणारी हानी झाली आहे.
सोमवारी सायंकाळी मिठगवाणे येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अंत्यसंस्कारावेळी एसटी कर्मचारी, विविध क्षेत्रांतील मान्यवर, शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
त्यांच्या पश्चात दोन मुलगे, सून आणि नात असा परिवार आहे.