लक्ष्मिकांत बेर्डेंनी संपूर्ण सिनेसृष्टीला व्यवसायाचे धडे दिले : अभिनेता अभिनय बेर्डे

​हिंदू वैश्यवाणी युवा संघटनेचा शानदार शुभारंभ : अमित गवंडळकर यांची अध्यक्षपदी निवड

​सावंतवाडी । प्रतिनिधी :
“माझे वडील, दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांनी संपूर्ण सिनेसृष्टीला व्यवसाय कसा करायचा, हे शिकवले. ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ त्यांना प्रेमाने ‘पक्का वाणी’ म्हणायचे. वडिलांवर हे व्यवसायाचे संस्कार याच समाजाने केले आहेत,” असे भावनिक उद्गार लोकप्रिय तरुण अभिनेता अभिनय बेर्डे यांनी येथे काढले.

​सावंतवाडी येथील वैश्य भवन येथे आयोजित ‘हिंदू वैश्यवाणी युवा संघटना’ स्थापनेच्या शुभारंभ सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी त्यांनी मराठी तरुणांनी व्यवसायात उतरून प्रगती करण्याचे आवाहन केले.

​मराठी माणूस व्यवसायात मोठा व्हावा
​अभिनय बेर्डे पुढे म्हणाले की, “मराठी माणसाला व्यवसाय कळत नाही, असे म्हटले जाते, पण तसे नाही. सिंधुदुर्गात ज्या पद्धतीने वैश्य समाज एकत्रित आला आहे, तसे चित्र मुंबईतही दिसत नाही. युवा पिढीने उद्योग आणि व्यवसायात पुढाकार घेऊन मराठी माणसाचे नाव मोठे करावे. या युवा संघटनेला माझा पूर्ण पाठिंबा राहील.”

​भव्य रॅली आणि संघटनेची घोषणा
​कार्यक्रमाची सुरुवात शहरातून काढण्यात आलेल्या भव्य बाईक रॅलीने झाली.
त्यानंतर अभिनय बेर्डे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून संघटनेचा अधिकृत शुभारंभ करण्यात आला. जिल्हाध्यक्ष सुनील भोगटे यांनी यावेळी अमित गवंडळकर यांची हिंदू वैश्यवाणी युवा संघटनेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याची घोषणा केली.
​ ​या सोहळ्याला माजी मंत्री आमदार दीपक केसरकर, माजी आमदार राजन तेली, कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

​आ. दीपक केसरकर म्हणाले, “युवा संघटन हा समाजातील महत्त्वाचा टप्पा आहे. तरुणांमधील ऊर्जा उद्योजक घडवण्यासाठी कामी येईल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी नवनियुक्त अध्यक्ष अमित गवंडळकर यांनी सामाजिक बांधिलकी जपत कॅन्सर हॉस्पिटलला १० हजार रुपयांची मदत जाहीर केली.

​गुणवंतांचा आणि लोकप्रतिनिधींचा सत्कार
​यावेळी समाजातील नवनिर्वाचित लोकप्रतिनिधी, डॉक्टर, प्राध्यापक आणि विविध क्षेत्रात विशेष प्राविण्य मिळवलेल्या गुणवंतांचा अभिनय बेर्डे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यामध्ये संदेश पारकर, सुहास गवंडळकर, दिपलक्ष्मी पडते, आनंद नेवगी यांसह अनेक मान्यवरांचा समावेश होता.

​कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जुईली पांगम व उमा टिळवे-शिरसाट यांनी केले, तर आभार अरुण भिसे यांनी मानले. या सोहळ्याला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैश्यवाणी समाजाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.