श्री बांदेश्वर मंदिरात महाशिवरात्री सोहळा उत्साहात सुरु 

दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी 

बांदा : प्रतिनिधी

 

बांदा येथील प्रसिद्ध व जागृत स्वयंभू श्री देव बांदेश्वर मंदिरात प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही महाशिवरात्री उत्सव भक्तिमय वातावरणात सुरु आहे. शनिवारी रात्री पालखी सोहळ्याने उत्सवाला आरंभ झाला. श्री दर्शन घेण्यासाठी भाविकांची अलोट गर्दी झाली आहे. शिवलिंगावर अभिषेक करण्यासाठी भाविकांच्या रांगा लागल्या आहेत.

 

यानिमित्त आज सकाळी सुर्योदयापासून ते दुसऱ्या दिवशी सुर्योदयापर्यंत स्वयंभू लिंगावर अष्टौप्रहर रुद्रावर्तनद्वारा अभिषेक होईल. सकाळपासून श्री शिवलिलामृत ग्रंथ पारायण सुरु आहे. सायंकाळी भजनाचा कार्यक्रम होईल. रात्री ९ ते १२ श्रींची मंदिराभोवती सवाद्य पालखी प्रदक्षिणा होईल.

 

सोमवारी उद्या सायं ४.३० वाजता श्रींची पालखी मिरवणुक वाजत गाजत श्री पाटेश्वर मंदिराकडे प्रस्थान करील. श्री पाटेश्वर मंदिरातील भजनानंतर पालखीचे पारंपारिक राजमार्गाने मंदिरापाशी आगमन होईल. त्यानंतर मंदिराभोवती प्रदक्षिणा व भजन करुन पालखीचे पुन्हा मंदिरात आगमन होईल. यावेळी महाआरती होईल. रात्रौ ९ वा. नितीन आसयेकर प्रस्तुत श्री देवी भुमिका लोककला दशावतार नाट्यमंडळ मळगांव यांचा नाट्यप्रयोग सादर होईल.

 

विहिरीतील पाणी काढून पाईपद्वारे थेट शिवलिंगावर अभिषेक करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासाठी महिला व पुरुषांच्या स्वतंत्र रांगा करण्यात आल्या आहेत.