खेड (प्रतिनिधी) – काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतान यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केल्याच्या वक्तव्यानंतर राज्यातील राजकारण तापले आहे. या वक्तव्याचा निषेध करत संपूर्ण महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीच्या वतीने विविध ठिकाणी आंदोलन करण्यात येत असून, कोकणातील खेड शहरातही आज तीव्र आंदोलन झाले.
खेड भाजपच्या वतीने भाजप नेते तथा माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेले वक्तव्य हे महाराष्ट्राच्या अस्मितेला ठेच पोहोचवणारे असल्याचा आरोप यावेळी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आला. या वक्तव्याचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवत, हर्षवर्धन सपकाळ यांनी तात्काळ माफी मागावी, अशी मागणी भाजप कार्यकर्त्यांनी केली.
यावेळी बोलताना वैभव खेडेकर यांनी सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचे नव्हे तर संपूर्ण देशाचे आराध्य दैवत आहेत. त्यांची तुलना कोणत्याही परकीय आक्रमक किंवा वादग्रस्त व्यक्तीशी करणे हे महाराष्ट्र सहन करणार नाही.
तसेच हर्षवर्धन सपकाळ कोकणात आल्यास त्यांच्या चेहऱ्याला काळ फासण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. या आंदोलनात भाजप तालुका अध्यक्ष ऋषिकेश मोरे, उपजिल्हाध्यक्ष संजय आखाडे, युवा मोर्चा सरचिटणीस मिलिंद नांदगावकर, जिल्हा सचिव शशांक सिनकर यांच्यासह वैजेश सागवेकर, प्रशांत गमरे, ओवैस चौगुले, अक्षय सनगरे, सोशल मीडिया प्रमुख सर्वेश पवार, प्रदीप भोसले तसेच भाजपचे असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पोलिसांच्या उपस्थितीत आंदोलन शांततेत पार पडले. हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्याचे पडसाद आगामी काळातही राज्याच्या राजकारणात उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.










