खेड | प्रतिनिधी – खेड तालुक्यातील अनेक दशकांपासून प्रलंबित असलेल्या न्यू मांडवे लघु पाटबंधारे प्रकल्पाला अखेर मंजुरी मिळाल्याने परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. तब्बल ३२ वर्षांचा दीर्घ वनवास संपवत हा ऐतिहासिक निर्णय आज, १६ फेब्रुवारी २०२६ रोजी घेण्यात आला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी ‘वर्षा’ येथे झालेल्या व्यय व अग्रक्रम समिती (EPC) बैठकीत न्यू मांडवे लघु पाटबंधारे प्रकल्प पूर्ण करण्यास अंतिम मंजुरी देण्यात आली. या निर्णयामुळे वर्षानुवर्षे रखडलेला प्रकल्प मार्गी लागणार असून, परिसरातील शेती व पाणीपुरवठ्याच्या प्रश्नाला मोठा दिलासा मिळणार आहे.
या लढ्याचे प्रमुख शिल्पकार आणि जल फाउंडेशनच्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा करणारे नितीन सखाराम जाधव यांच्या जिद्द, निष्ठा आणि अथक प्रयत्नांमुळे हा क्षण शक्य झाला, अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. प्रकल्पाला मंजुरी मिळावी यासाठी त्यांनी वेळोवेळी शासनाकडे पाठपुरावा केला होता. २६ जानेवारी २०२६ रोजी त्यांनी आत्मदहनाचा निर्णय जाहीर केला होता, मात्र शासनाच्या मध्यस्थीनंतर तो निर्णय स्थगित करण्यात आला होता. शासनाला १५ फेब्रुवारीपर्यंत दिलेल्या मुदतीनंतर आज अखेर सकारात्मक निर्णय घेण्यात आला.
या संपूर्ण प्रक्रियेत प्रकल्पग्रस्त शेतकरी, जागा मालक, विविध गावांतील ग्रामस्थ तसेच किंजळे, नातू घोगरे, दहिवली आणि शिंगरी या चारही गावांच्या नागरिकांनी दाखवलेली एकजूट निर्णायक ठरली. तसेच स्थानिक खासदार, विविध राजकीय नेते व कार्यकर्त्यांनीही वेळोवेळी केलेल्या पाठपुराव्यामुळे या लढ्याला बळ मिळाले.
न्यू मांडवे प्रकल्पाला मिळालेली मंजुरी ही केवळ प्रशासकीय निर्णय नसून, ती जनतेच्या संयमाची, एकतेची आणि विश्वासाची ऐतिहासिक जिंक असल्याची भावना व्यक्त होत आहे. या निर्णयामुळे भविष्यात परिसरातील शेती, पाणी उपलब्धता आणि ग्रामीण विकासाला नवी दिशा मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.










