कशेळी ग्रामस्थांचा आंदोलनाचा पवित्रा

राजापूर तालुक्यातील कशेळी येथील देवघळी बीच.
कशेळी देवघळी समुद्रकिनाऱ्याचा विकास रखडला; प्रशासनाच्या अनास्थेमुळे पर्यटकांची गैरसोय
काम सुरू न झाल्यास ‘जलकुंभात’ बसून उपोषणाचा इशारा

राजापूर | वार्ताहर : राजापूर तालुक्यातील निसर्गरम्य कशेळी गावचा ‘देवघळी बीच’ सध्या पर्यटकांच्या पसंतीस उतरत आहे. मात्र, या पर्यटन स्थळाचा विकास आणि सुशोभीकरणासाठी निधी मंजूर होऊन, वर्क ऑर्डर निघूनही प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली नाही. प्रशासनाच्या या दिरंगाईमुळे स्थानिक ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट असून, माजी सरपंच दीपक हळदणकर यांच्यासह ग्रामस्थांनी आता आंदोलनाचा इशारा दिला आहे.
आवळचीवाडी येथील देवघळी समुद्रकिनारा विकसित करण्यासाठी पर्यटन विभागाकडून २५ लाख रूपये निधी मंजूर झाला आहे. पतन विभागामार्फत या कामाची वर्क ऑर्डर २०२४ मध्येच काढण्यात आली होती. मात्र, वर्ष उलटत आले तरी प्रत्यक्ष जमिनीवर एकही वीट रचली गेलेली नाही. पर्यटकांची संख्या वाढत असताना सुविधांचा अभाव असल्याने पर्यटकांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.
ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, पतन विभाग रत्नागिरीच्या अधिकाऱ्यांशी वेळोवेळी संपर्क साधण्यात आला. प्रत्यक्ष किनाऱ्यावर पाहणी देखील झाली, तरीही कामाला गती मिळालेली नाही. संबंधित जे. ई. आणि यांच्याशी संपर्क साधला असता केवळ आश्वासने दिली जात असल्याचा आरोप माजी सरपंच दीपक हळदणकर यांनी केला आहे.
कशेळी ग्रामपंचायतीने या संदर्भात पतन विभाग, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हाधिकारी रत्नागिरी यांच्याकडे लेखी पत्रव्यवहार केला आहे. वारंवार पाठपुरावा करूनही दाद मिळत नसल्याने, आता प्रशासनाला जाग आणण्यासाठी ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. विहित वेळेत काम सुरू न झाल्यास पाण्यात बसून उपोषण करण्याचा इशारा ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आला आहे.
या पर्यटनस्थळाचा यापुर्वी २०१९ मध्ये मिरीटाईम बोर्डामार्फत सुमारे १ कोटी रूपये खर्चुन विकास करण्यात आला आहे. तर अलिकडच्या काळात या ठिकाणी रस्ता काँक्रीटीकरण करणे, पर्यटकांसाठी स्वच्छतागृह उभारणे व परिसराचे सुशोभिकरण करणे अशी कामे सुचविण्यात आली आहेत. संबधीत विभागाच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणाची पाहणी देखील केल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. वर्क ऑर्डर निघूनही ठेकेदार आणि अधिकारी जाणीवपूर्वक दिरंगाई करत आहेत. यामुळे पर्यटनावर परिणाम होत असून, आता आम्हाला आंदोलनाशिवाय पर्याय उरलेला नाही असे माजी सरपंच दीपक हळदणकर यानी सांगितले. तरी शासनाने तातडीने काम सुरू करून पर्यटकांची होणारी गैरसोय दूर करावी अशी मागणी ग्रामस्थांतून करण्यात आली आहे.