रत्नागिरी : प्रतिनिधी
भारतीय तटरक्षक दलाने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी रत्नागिरी येथे तटरक्षक क्षेत्र (पश्चिम) मध्ये स्वदेशी प्रगत हलके हेलिकॉप्टर (अॅडव्हान्स्ड लाईट हेलिकॉप्टर – एमके -III) विमान, तटरक्षक 875 समाविष्ट केले. कोस्ट गार्ड एअर स्टेशन, रत्नागिरी येथे पारंपारिक ‘वॉटर कॅनन सॅल्युट’ देऊन या विमानाचे स्वागत करण्यात आले. भारतीय तटरक्षक वायू अवस्थान रत्नागिरीच्या कमांडिंग ऑफिसरनी विमान आणि क्रू सदस्यांचे स्वागत केले.
रत्नागिरीत एएलएच एमके-३ चा समावेश झाल्याने पश्चिम किनारपट्टीवरील भारतीय तटरक्षक दलाच्या कार्यक्षमतेत लक्षणीय वाढ झाली आहे. हे अत्याधुनिक हेलिकॉप्टर प्रगत रडारने सुसज्ज असून, त्यात इलेक्ट्रो-ऑप्टिकल पॉड आणि ऑटोमॅटिक आयडेंटिफिकेशन सिस्टीमद्वारे लांब पल्ल्याच्या इमेजिंग आणि ओळखण्याच्या क्षमतेचा समावेश आहे. याशिवाय, लक्ष्याला निष्प्रभ करण्यासाठी विमानाच्या केबिनमध्ये १२.७ मिमी हेवी मशीन गन बसवण्यात आली आहे. या वाढीव पाळत ठेवणे, शोधणे, ओळखणे आणि प्रतिसाद देण्याच्या क्षमतेमुळे विशेषतः महाराष्ट्राच्या संवेदनशील किनारपट्टीवर, ईईझेड मधील राष्ट्राच्या सागरी हितसंबंधांचे रक्षण करण्याची भारतीय तटरक्षक दलाची क्षमता लक्षणीयरीत्या वाढेल.
तटरक्षक ८७५ चा समावेश विशेष महत्त्वाचा आहे कारण रत्नागिरी येथे ८३१ स्क्वॉड्रन (तटरक्षक) मध्ये तैनात करण्यात येणाऱ्या पाच एएलएच एमके-३ विमानांपैकी हे पहिले विमान आहे. उर्वरित विमानांच्या टप्प्याटप्प्याने होणाऱ्या समावेशामुळे स्क्वॉड्रनच्या कार्यक्षमतेत लक्षणीय वाढ होईल आणि तटरक्षक क्षेत्र (पश्चिम) च्या विस्तीर्ण सागरी क्षेत्रात सतत हवाई पाळत ठेवणे आणि जलद प्रतिसाद देणे शक्य होईल. या क्षेत्राला त्याच्या धोरणात्मक महत्त्व आणि भौगोलिक स्थानामुळे विविध आव्हानांचा सामना करावा लागतो.
भारत सरकारच्या ‘आत्मनिर्भर भारत’ या दृष्टीकोनानुसार, एएलएच एमके ३ विमानाचा समावेश हे तटरक्षक दलाच्या उड्डाण क्षेत्रात स्वदेशी क्षमता आणि स्वावलंबन वाढवण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. या कार्यक्रमांतर्गत करारबद्ध झालेल्या एकूण नऊ विमानांपैकी, मेसर्स एचएएल सोबतच्या नवीन करारांतर्गत भारतीय तटरक्षक दलात समाविष्ट होणारे सीजी ८७५ हे पाचवे एएलएच एमके-३ विमान आहे. या प्रगत प्लॅटफॉर्मच्या समावेशामुळे तटरक्षक दलाची रोटरी-विंग विमान क्षमता अधिक बळकट होईल आणि देशाच्या विस्तीर्ण किनारपट्टीवर आणि ईईझेडमध्ये सतत सागरी पाळत ठेवणे, शोध आणि बचाव कार्य, प्रदूषण नियंत्रण आणि इतर ऑपरेशन्स हाती घेण्याची क्षमता वाढेल. तसेच, हा समावेश ८३१ स्क्वॉड्रन आणि आयसीजीएएस रत्नागिरीच्या कार्यक्षमतेतील एका नव्या पर्वाची सुरुवात आहे.













