राजापूर : १५ ग्रामपंचायतीच्या २१ रिक्त जागांसाठी पोटनिवडणुक

मतदार यादी कार्यक्रम घोषित

राजापूर (वार्ताहर): जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुका आटोपताच राजापूर तालुक्यातील १५ ग्रामपंचायतीतील २१ सदस्यांच्या रिक्त जागांसाठी पोटनिवडणुका घेण्याचे दृष्टीने कार्यवाही सुरू झाली असून मतदार यादी कार्यक्रम घोषीत करण्यात आला आहे.

राज्यातील ग्रामपंचायतीतील सदस्य / थेट सरपंच यांच्या निधन, राजीनामा, अनर्हता किंवा इतर अन्य कारणांमुळे रिक्त जागांच्या पोटनिवडणुकांसाठी पारंपारिक पध्दतीने राबविण्यात यावयाचा मतदार यादीचा कार्यक्रम राबविला जात आहे.

यासाठी दिनांक ३१/०१/२०२६ पर्यंत उक्त कारणांमुळे रिक्त होणाऱ्या थेट सरपंच सदस्यांच्या जागांचा समावेश सदर मतदार यादी कार्यक्रमात करण्यात येणार आहे. प्रारुप मतदार यादी प्रसिध्द केल्यानंतर रिक्त जागांचा प्रवर्गनिहाय अहवाल मतदार यादी ग्राह्य धरण्यात येणार आहे. या करिता ०१ जुलै,२०२५ अखेरची यादी ग्राह्य धरली जाणार आहे. या अनुषंगाने प्रभाग निहाय प्रारुप मतदार यादी प्रसिध्द करण्याचा दिनांक सोमवार १६/०२/२०२६ असून हरकती व सूचना दाखल करण्याचा कालावधी सोमवार १६/०२/२०२६ ते दिनांक २०/०२/२०२६ पर्यंत राहिल. प्रभाग निहाय अंतीम मतदार यादी प्रसिध्द करण्याचा अंतीम दिनांक २४/०२/२०२६ अशी राहील अशा सूचना राज्य निवडणुक आयोगातर्फे प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.

राजापूर तालुक्यातील कोळवणखडी ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्रं. १ सर्वसाधारण, प्रभाग क्र. २ नागरिकाचा मागास प्रवर्ग माहिला या दोन जागांसाठी, नाणार ग्रामपंचायतीच्या प्रभाग १ मधील नागरिकाचा मागास प्रवर्ग माहिला एका जागेसाठी, झर्ये ग्रामपंचायतीच्या प्रभाग २ मधील अनू. जाती व नागरीकांचा मागास प्रवर्ग महीला या दोन जागांसाठी, वडदहसोळ ग्रामपंचायतीच्या प्रभाग ३ मधील नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला या एका जागेसाठी, येळवण ग्रामपंचायतीच्या प्रभाग ३ मधील अनु. जाती या जागेसाठी, हातिवले ग्रामपंचायतीच्या प्रभाग ३ सर्वसाधारण महिला जागेसाठी तर खरवते ग्रा. पं. च्या प्रभाग २ सर्वसाधारण माहिला जागेसाठी, केळवली ग्रा. पं. च्या प्रभाग २ मधील सर्वसाधारण महिला व प्रभाग ३ मधील सर्वसाधारण महिला तसेच प्रभाग ४ मधील सर्वसाधारण महिला या तीन जागांसाठी पोटनिवडणूक होणार आहे.

तसेच माडबन ग्रा. पं.च्या प्रभाग ३ मधील सर्वसाधारण महिला जागेसाठी, भालावली ग्रा. पं. च्या प्रभाग १ सर्वसाधारण जागेसाठी, कळसवली ग्रा. पं. च्या प्रभाग ३ मधील सर्वसाधारण व सर्वसाधारण महिला या दोन जागांसाठी, कोंडये तर्फे सौंदळ ग्रा. पं. च्या प्रभाग २ मदील नागरिकांचा मागास प्रवर्ग व प्रभाग ३ मधे सर्वसाधारण जागेसाठी निवडणूक होत आहे. तसेच साखर ग्रा. पं. च्या प्रभाग ३ मधील नागरिकांचा मागास प्रवर्ग एका जागेसाठी तर प्रिंदावण ग्रा. पं. च्या प्रभाग २ मधील एका सर्वसाधारण जागेसाठी तर धाऊलवल्ली ग्रा. प. च्या प्रभाग ३ मधील सर्वसाधारण जागेसाठी पोटनिवडणुक होणार आहे.