बालनाट्य, एकांकिका आणि संगीत नाटकांची मेजवानी
सावंतवाडी | प्रतिनिधी : कोकणची सांस्कृतिक राजधानी असलेल्या सावंतवाडी शहरात नाट्यकलेचा वारसा जतन करण्यासाठी आणि स्थानिक रसिकांना दर्जेदार प्रयोगांची पर्वणी देण्यासाठी ‘कै. दिनकर धारणकर स्मृती नाट्यमहोत्सव २०२६’ चे आयोजन करण्यात आले आहे. सावंतवाडी नगरपरिषद आणि क्षितिज इव्हेंट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या महोत्सवाचे हे चौथे वर्ष असून, २० ते २२ फेब्रुवारी या कालावधीत हा महोत्सव रंगणार आहे.
सावंतवाडीतील नाट्यकला जोपासणारे व्यक्तिमत्व कै. दिनकर धारणकर यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी आणि शहरात पुन्हा एकदा नाट्यकलेला उर्जितावस्था प्राप्त करून देण्यासाठी या महोत्सवाचे आयोजन सातत्याने केले जाते. यावर्षीच्या महोत्सवात बालनाट्य, एकांकिका आणि ऐतिहासिक अशा विविध जॉनरच्या नाटकांचा समावेश आहे.
महोत्सवाचे भरगच्च वेळापत्रक बॅ. नाथ पै सभागृहात दररोज सायंकाळी ६ वाजता हे नाट्यप्रयोग सादर होतील:
शुक्रवार, २० फेब्रुवारी: महोत्सवाचा प्रारंभ ‘लगोरी’ या बालनाट्याने आणि ‘देवराई’ या एकांकिकेने होईल.
शनिवार, २१ फेब्रुवारी: संगीत नाटकांची परंपरा जपणारे ‘संगीत होनाजी बाळा’ हे नाटक सादर केले जाईल.
रविवार, २२ फेब्रुवारी: महोत्सवाचा समारोप वि. वा. शिरवाडकर लिखित अजरामर कलाकृती ‘वीज म्हणाली धरतीला’ या नाट्यप्रयोगाने होणार आहे.
”सावंतवाडीचा सांस्कृतिक वारसा समृद्ध करण्यासाठी हा महोत्सव महत्त्वाचा दुवा ठरत आहे. जास्तीत जास्त रसिकांनी या महोत्सवाचा आनंद घ्यावा.”
— अॅड. अनिल निरवडेकर, प्रभारी नगराध्यक्ष.
प्रवेशिका आणि संपर्क नाट्य महोत्सवाचा लाभ घेण्यासाठी रसिकांना प्रवेशिका आवश्यक आहेत. या प्रवेशिका गांधी चौक येथील ‘पुराणीक फुड्स मार्ट’ येथे उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
या महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी क्षितिज इव्हेंटचे अध्यक्ष बाळ पुराणिक, लक्ष्मण नाईक, गुरुप्रसाद चिटणीस, प्रा. सिद्धेश नेरुरकर आणि हर्षवर्धन धारणकर हे विशेष परिश्रम घेत आहेत. तरी सावंतवाडीकर रसिकांनी या महोत्सवाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.











