प्रशासनाने तात्काळ निर्णय घेण्याची लोकप्रतिनिधी व व्यवस्थापन समितीची मागणी
मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून शाळा निर्लेखित करण्याचे आदेश
सावंतवाडी | प्रतिनिधी: सावंतवाडी तालुक्यातील सोनुर्ली येथील जिल्हा परिषद शाळा क्रमांक १ च्या इमारतीला मोठी भेग पडली असून, ही भिंत कोसळण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. शंभर वर्षांचा वारसा असलेल्या या शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आता ऐरणीवर आला असून, प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी पंचायत समिती सदस्य जितेंद्र गावकर व शाळा व्यवस्थापन समितीने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) रवींद्र खेबुडकर यांच्याकडे केली आहे.
पावसाळ्यापूर्वी दुर्घटनेची भीती
सोनुर्ली येथील ही शाळा अत्यंत जुनी असून, काही काळापूर्वीच या शाळेचा शतकमहोत्सव साजरा करण्यात आला होता. मात्र, सध्या शाळेच्या एका वर्गखोलीच्या भिंतीला पडलेली भेग दिवसागणिक रुंदावत चालली आहे. सुरुवातीला लहान वाटणारी ही भेग आता धोकादायक बनली असून, पावसाळ्यात ही भिंत खचून मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या परिस्थितीमुळे शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून सकारात्मक प्रतिसाद
शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा मंजिरी गावकर यांनी या समस्येकडे पं. स. सदस्य जितेंद्र गावकर यांचे लक्ष वेधले होते. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून श्री. गावकर यांनी तातडीने शिष्टमंडळासह मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांची भेट घेतली. शाळेच्या इमारतीची दुरवस्था आणि संभाव्य धोका त्यांच्या निदर्शनास आणून दिला.
यावर श्री. खेबुडकर यांनी सकारात्मक प्रतिसाद देत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना सदर इमारत तातडीने ‘निर्लेखित’ (Condemn) करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, नवीन इमारतीचा आराखडा तयार करून मंजुरीसाठी सादर करण्याचे आदेश दिले असून लवकरच प्रत्यक्ष पाहणी करण्याचे आश्वासनही दिले आहे.
शिष्टमंडळाची उपस्थिती
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन देताना वेत्ये सरपंच गुणाजी गावडे, शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष सखाराम कुडतरकर, शिक्षणतज्ज्ञ नागेश गावकर, ग्रामपंचायत सदस्य संजना राऊळ, समिती सदस्या सिमरन जाधव यांसह ग्रामस्थ उपस्थित होते.
”विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरक्षित वातावरणात होणे गरजेचे आहे. या जुन्या इमारतीचा प्रश्न मार्गी लावून नवीन इमारत लवकरात लवकर उभी राहावी, यासाठी आमचा पाठपुरावा सुरू राहील.”
— जितेंद्र गावकर (सदस्य, पंचायत समिती)












