ग्रामदैवत भैरीदेवी मंदिरात धाडसी चोरी
मंडणगड:
शिरगाव येथील ग्रामदैवत श्री भैरीदेवी मंदिरातील पुरातन पितळी वस्तू अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे, चोरट्याने मंदिराच्या मुख्य दरवाजाची कडी उघडून आत प्रवेश केला आणि चोरी केली.
ही चोरी ७ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ०९:३० ते ८ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ०८:०० वाजेच्या दरम्यान घडली. चोरट्याने मंदिरातील १५ किलो वजनाची एक मोठी पितळी घंटा (किंमत ९,००० रुपये), ५ किलो वजनाची दुसरी पितळी घंटा (किंमत ३,००० रुपये) आणि सुमारे ७० ते ८० वर्षांपूर्वीची ५ किलो वजनाची पुरातन पितळी समई (किंमत ३,००० रुपये) असा एकूण १५,००० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे.
याप्रकरणी फिर्यादी मधुकर गंगाराम पाटील (वय ७१, रा. शिरगाव पाटीलवाडी) यांनी दिलेल्या तक्रारीवरून मंडणगड पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०५ (डी) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.












