रत्नागिरी : प्रतिनिधी
रत्नागिरी जिल्हा व सत्र न्यायालयाच्या अधिकृत ईमेलवर बॉम्ब ठेवण्यात आल्याची धमकीचा संदेश प्राप्त झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. न्यायालयाचे कामकाज सुरू असताना आलेल्या या बातमीमुळे प्रशासकीय आणि सुरक्षा यंत्रणा खडबडून जागी झाली असून तातडीने पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत संपूर्ण इमारत रिकामी केली आहे.
या अचानक घडलेल्या प्रकारामुळे न्यायालयात उपस्थित असलेले न्यायाधीश, वकील, पक्षकार आणि आरोपी यांना तात्काळ सुरक्षित बाहेर काढण्यात आले. सुरक्षेचा उपाय म्हणून बॉम्ब शोध व नाशक पथकाला पाचारण करण्यात आले असून सध्या इमारतीची कसून तपासणी सुरू आहे. या घटनेमुळे न्यायालय परिसरात नागरिकांची मोठी गर्दी जमली असून तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस निरीक्षक विवेक पाटील हे सध्या परिस्थितीवर पूर्ण नियंत्रण ठेवून संपूर्ण कारवाई यशस्वीपणे हाताळत आहेत.












