रोख रक्कम असलेले व रस्त्यात सापडेलेले पैशाचे पाकीट केले परत

खेरवसे येथील दिनेश कांबळे यांचा प्रामाणिकपणा

लांजा (प्रतिनिधी) : ७००० रुपयांची रोख रक्कम असलेले आणि रस्त्यात सापडलेले पाकीट प्रामाणिकपणे परत करणाऱ्या खेरवसे बौद्धवाडी येथील दिनेश कांबळे यांचा लांजा पोलिसांकडून सन्मान करण्यात आला.
लांजा भटवाडी येथील रहिवास असलेले आणि माजी मंडळ अधिकारी असलेले पांडुरंग शिंदे यांचे पाकीट लांजा बाजार पेठ येथे येत असताना पडले होते. खेरवसे बौद्धवाडी येथील दिनेश कांबळे यांना सदरचे पाकीट आज गुरुवारी सकाळी लांजा सोसायटी या ठिकाणी सापडले होते. त्यांनी ते लांजा पोलीस ठाण्यात प्रामाणिकपणे जमा केले होते. पाकिटमध्ये सात हजार रुपयांची रोख रक्कम होती. तसेच काही डॉक्युमेंट देखील होती.‌ पाकीट तपासल्या नंतर त्यात एस के फर्निचर ची पावती होती. त्यावर पांडुरंग शिंदे यांचे नाव आणि मोबाईल नंबर होता. पोलिसांनी त्यांना फोन केला असता हे पाकीट त्यांचेच असल्याचे स्पष्ट झाले.
त्यानंतर पांडुरंग शिंदे यांना लांजा पोलीस ठाण्यात बोलावून दिनेश कांबळे यांनी त्यांना ते पाकीट परत केले. यावेळी पोलीस उपनिरीक्षक अमोद सरंगले तसेच संदीप साळुंखे ते उपस्थित होते. दिनेश कांबळे यांच्या या प्रामाणिकपणाबद्दल सेवानिवृत्त सर्कल पांडुरंग शिंदे तसेच पोलीस उपनिरीक्षक अमोद सरंगले, संदीप साळुंखे यांनी त्यांचे कौतुक व अभिनंदन केले. दिनेश कांबळे यांच्या प्रामाणिकपणाबद्दल अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.