राजापुरात शिवजयंती उत्सव मोठया उत्साहात साजरा

ऐतिहासिक वेषभूषा करत विद्यार्थ्यांनी आणली रंगत

नगराध्यक्षांसह नगरसेवक, नागरिक, अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून शिवरायांना अभिवादन

राजापूर (वार्ताहर): राजापूर नगर परिषदेच्या वतीने गुरूवारी छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी लोकनियुक्त नगराध्यक्ष एड. हुस्नबानू खलीफे यांनी शिवपुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
तर उपनगराध्यक्ष विनय गुरव यांसह काँग्रेसचे गटनेते एड. जमिर खलिफे, शिवसेना गटनेते एड. राहुल तांबे व मुख्याधिकारी अभिजित कुंभार यांनीही छत्रपती शिवाजी महाराज महाराज यांच्या पुतळयाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त शिवस्मारक परिसरात शहरातील शाळांतील विद्यार्थ्यांचा विशेष सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. विश्वनाथ विद्यालय राजापूर नं. १, गोखले कन्या शाळा, गुजराळी शाळा, वरचीपेठ शाळा तसेच आर.एस.पी.एम. शाळेतील विद्यार्थ्यांनी पोवाडा गायन व ऐतिहासिक नृत्य सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. विद्यार्थ्यांच्या सादरीकरणामुळे कार्यक्रमाला इतिहासाचा अभिमान जागवणारा रंग चढला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नगरपरिषद कर्मचारी संदेश जाधव यांनी केले. तर संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन कार्यालयीन अधीक्षक जितेंद्र जाधव, अनुष्का जुवेकर, प्रथमेश वनगुले तसेच नगरपरिषदेतील अधिकारी व कर्मचारी यांनी विशेष मेहनत घेऊन यशस्वी केले. शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सकाळ सत्रातल्या कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शिवजंयतीच्या निमित्ताने जवाहरचौकातील शिवस्मारकाची केलेल्या सजावट आणि रोषणाईने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. याप्रसंगी सर्व नगरसेवक तसेच नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयघोष करण्यात आला.
याप्रसंगी राजापूर पोलीस निरीक्षक अमित यादव यांसह पोलीस अधिकारी व कर्मचारी तसेच शिक्षण विभागाच्या वतीने गटशिक्षणाधिकारी उत्तम भोसले यांनीही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळयाला पुष्पहार अर्पण करून अभिवाद केले.