राजापूर (प्रतिनिधी): शहरातील बंगलवाडी येथील रहिवाशी आणि नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष अशोक पांडुरंग गुरव (६३) यांचे शुक्रवारी पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले.
एक उत्कृष्ट कबड्डी पटू असलेले अशोक गुरव हे गेले काही महिने अर्धांगवायूने आजारी होते. त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना उपचारासाठी मुंबईत रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचारही सुरू होते मात्र उपचार सुरू असतानाच शुक्रवारी पहाटे त्यांची प्राणज्योत मालावली. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच अनेकांनी त्यांच्या बंगलवाडी निवासस्थानी धाव घेत त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले.
शिवसेनेचे निष्ठावान कार्यकर्ते असलेल्या गुरव यांनी शिवसेना संघटनेत विविध पदांवर काम केले होते. राजापूर नगर परिषदेत दहा वर्षे नगरसेवक म्हणूनही त्यांनी काम केले होते. या कार्यकाळात त्यांनी नगर परिषदेत शिवसेनेचे गटनेते तसेच उपनगराध्यक्षपदही भूषविले होते. आपल्या नगरसेवक पदाच्या कार्यकाळात त्यांनी शहरासह आपल्या प्रभागातील विविध विकास कामांना न्याय दिला होता.
राजापुरात काही वर्षापुर्वी झालेल्या राज्यस्तरिय कब्बड्डी स्पर्धेच्या आयोजनात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. अनेक नवोदित खेळाडूंना त्यांनी कब्बड्डीचे धडे दिले होते. त्यांच्यावर गुरववाडी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा प्रतिक, दोन मुली, सुन, जावई, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्यावर शुक्रवारी सायंकाळी गुरववाडी स्मशान भूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.












