अन्यायग्रस्त पदवीधर शिक्षकांना न्याय मिळवून देणार – राज्यमंत्री योगेश कदम

खेड (प्रतिनिधी) – राज्यात लागू करण्यात आलेल्या नवीन संच मान्यतेमुळे अनेक जिल्ह्यांतील पदवीधर शिक्षक अतिरिक्त ठरले असून याचा सर्वाधिक फटका रत्नागिरी जिल्ह्याला बसल्याचे चित्र आहे. रत्नागिरी जिल्ह्यात समाजशास्त्र व भाषा विषयाचे सुमारे ९६० पदवीधर शिक्षक अतिरिक्त ठरले असून त्यांच्या भवितव्याबाबत मोठी अनिश्चितता निर्माण झाली आहे. या अतिरिक्त शिक्षकांचे पुढे नेमके काय होणार, याबाबत सध्या ठोस उत्तर कोणाकडेही नसल्याने शिक्षक वर्गात तीव्र अस्वस्थता आहे.

या अन्यायग्रस्त शिक्षकांना न्याय मिळावा आणि या गंभीर प्रश्नावर योग्य तोडगा निघावा, यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या शिष्टमंडळाने नुकतीच नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य अण्णा कदम यांची भेट घेतली. या भेटीत शिक्षकांच्या समस्या, नवीन संच मान्यतेमुळे निर्माण झालेली परिस्थिती आणि अतिरिक्त ठरलेल्या पदवीधर शिक्षकांच्या अडचणी सविस्तरपणे मांडण्यात आल्या. अण्णा कदम यांनी संपूर्ण विषय समजून घेत शिक्षकांच्या प्रश्नाबाबत सकारात्मक भूमिका घेतली.

दरम्यान, शिक्षक समितीचे अध्यक्ष संतोष चव्हाण यांनी दूरध्वनीद्वारे राज्यमंत्री योगेश कदम यांच्याशी संपर्क साधून अतिरिक्त पदवीधर शिक्षकांची वस्तुस्थिती त्यांच्यासमोर मांडली. यावेळी राज्यमंत्री योगेश दादा कदम यांनी या प्रश्नाची गांभीर्याने दखल घेत लवकरच शिक्षण मंत्र्यांशी चर्चा करून मंत्रालयात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या शिष्टमंडळाची बैठक आयोजित करण्याचे आश्वासन दिले. संच मान्यतेमुळे अतिरिक्त ठरलेल्या समाजशास्त्र व भाषा विषयाच्या शिक्षकांच्या बाबतीत कायमस्वरूपी व न्याय्य तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

या पार्श्वभूमीवर येत्या दोन ते तीन दिवसांत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे शिष्टमंडळ राज्यमंत्री योगेश दादा कदम यांच्या माध्यमातून शिक्षण मंत्र्यांची भेट घेणार आहे. या भेटीत अतिरिक्त पदवीधर शिक्षकांबाबतची संपूर्ण माहिती सादर करून या प्रश्नावर ठोस निर्णय घेण्याची मागणी करण्यात येणार आहे.

अतिरिक्त पदवीधर शिक्षकांच्या प्रश्नावर सकारात्मक भूमिका घेऊन तोडगा काढण्याचे आश्वासन दिल्याबद्दल महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने ना. कदम यांचे आभार मानण्यात आले आहेत. अण्णा कदम यांच्याशी चर्चा करण्यासाठी गेलेल्या या शिष्टमंडळात तालुकाध्यक्ष संतोष चव्हाण, सचिव धर्मपाल तांबे, सल्लागार सुनील सावंत, परशुराम पेवेकर, कार्याध्यक्ष अनिल यादव, कोषाध्यक्ष नवनीत घडशी, उपाध्यक्ष बबन साळवी, तुकाराम काताळे, संघटना प्रवक्ते शैलेश पराडकर यांच्यासह संजय गडाळे, बबन मोरे, येडू केकान, राजेश भागणे, विलास कासार, शशिकांत भुवड आणि राजाराम दरेकर हे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.