कोल्हापूर येथे किराणा मालाची खरेदी करून घरी परतत असताना काळाचा घाला
देवरूख (प्रतिनिधी) : कोल्हापूर शाहूवाडी येथे संगेमश्वर नजीकच्या कसबा येथील तरूणाचा अपघाती मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. गजेंद्र शिवाजी देशमुख (वय- ४४) असे मृत तरूणाचे नाव आहे. कोल्हापूर येथे किराणा मालाची खरेदी करून गजेंद्र देशमुख हे दुचाकीवरून घरी परतत असताना काळाने घाला घातला. गजेंद्र यांच्या अपघाती मृत्यूने संगमेश्वर कसबा परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
याबाबत पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, देशमुख हे कोल्हापूर येथे किराणा माल खरेदी करून त्यांच्या ताब्यातील दुचाकी (क्रमांक एमएच ०८ बीए ९००५) वरून कसबा येथे परतत होते. दरम्यान,शाहूवाडी तालुक्यातील वालुर गावच्या हद्दीत कचरे यांच्या बागेजवळ समोरून येणारी सुझुकी सुपर कॅरी (क्रमांक एमएच ०९ एफएल ९५०१) चालक तुकाराम शंकर माने (रा. वालूर, ता. शाहूवाडी, जि. कोल्हापूर) हा आपल्या ताब्यातील वाहन घेऊन येत असताना त्याने दुचाकीला समोरासमोर जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत गजेंद्र देशमुख गंभीर जखमी झाले व त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या प्रकरणी मृताचे वडील शिवाजी देशमुख यांनी शाहूवाडी पोलीस ठाणे येथे फिर्याद दिली आहे. त्यानुसार गुन्हा क्रमांक ४६/२०२५ नोंदविण्यात आला असून भारतीय दंड संहिता कलम १०६(१), २८१, १२५(अ)(ब) तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४ अन्वये तुकाराम माने यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल मुल्लानी करीत आहेत.











