खेड (प्रतिनिधी) : खेड पोलीस ठाण्याच्या पथकाने सातत्याने होत असलेल्या मंदिर चोरीच्या घटनांचा यशस्वी उलगडा करत मोठी कामगिरी बजावली आहे. शिरगाव, कुळवंडी, एनवरे, कशेडी तसेच रायगड व रत्नागिरी जिल्ह्यातील सुमारे ३० गावांमध्ये मंदिरांमधून चोरी करणाऱ्या मुख्य आरोपीस अटक करण्यात खेड पोलिसांना यश आले आहे. या कारवाईत मंदिरातील सुमारे ८०० किलो वजनाच्या घंटा व समई असा मोठ्या प्रमाणावर मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
प गेल्या काही महिन्यांपासून मंदिरांमध्ये होत असलेल्या चोरीच्या घटनांमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. नागरिकांमध्ये अस्वस्थता वाढली होती. या पार्श्वभूमीवर खेड पोलिसांनी अत्यंत कसून आणि सातत्यपूर्ण तपास सुरू ठेवत आरोपीच्या हालचालींवर लक्ष ठेवले. अखेर पोलिसांच्या शिताफीने राबवलेल्या कारवाईमुळे मुख्य आरोपीस अटक करण्यात आली आणि चोरीस गेलेला मौल्यवान धार्मिक साहित्य पुन्हा हस्तगत करण्यात आले.
ही धाडसी आणि यशस्वी कारवाई पोलीस उपनिरीक्षक रोहिदास केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या तपासात पोलीस कॉन्स्टेबल अजय कडू, वैभव ओहळ, विजय सातार्डेकर, कृष्णा दराडे आणि शिरीष साळुंखे यांनी विशेष परिश्रम घेतले. त्यांच्या मेहनतीमुळे नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास अधिक दृढ झाला आहे.
जिल्हा परिषद सदस्य अण्णा कदम यांच्याकडून पोलिसांचा सत्कार
या उल्लेखनीय कामगिरीबद्दल जिल्हा परिषद सदस्य अरुण उर्फ अण्णा कदम, जिल्हा परिषद सदस्य सचिन धाडवे तसेच युवती सेना जिल्हाप्रमुख सिद्धी शिंदे यांच्या हस्ते खेड पोलीस उपनिरीक्षक रोहिदास केंद्रे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी खेडचे पोलीस निरीक्षक विवेक अहिरे हे देखील उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी खेड पोलिसांच्या कार्याचे कौतुक करत भविष्यातही अशाच प्रकारे गुन्हेगारीविरोधात कठोर कारवाई करण्यासाठी शुभेच्छा दिल्या.













