कणकवली : कणकवली शहरातील प्रतिथयश इलेक्ट्रिकल्स व्यावसायिक तसेच आशिये गावचे रहिवासी व मूळ हरकुळ बुद्रुक येथील राजेश महादेव आजगावकर (वय ५५) यांचे गुरुवारी आकस्मिक निधन झाले. त्यांच्या निधनाने कणकवली शहरासह कुडाळदेशकर समाजात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हरकुळ येथील त्यांच्या बागेतील घरी ते दुपारी गेले असता त्यांना तेथेच हृदयविकाराचा तीव्र झटका आला. रात्री उशिरापर्यंत ते आशिये येथील घरी परतले नसल्याने कुटुंबीयांनी शोधाशोध केली असता ते हरकुळ बुद्रुक येथे मृत अवस्थेत आढळून आले. त्यानंतर त्यांना तातडीने कणकवली उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले.
राजेश आजगावकर यांनी कणकवली बस स्थानकाबाहेर ‘गजानन इलेक्ट्रिकल’ या दुकानाच्या माध्यमातून आपल्या व्यवसायाची सुरुवात केली होती. प्रामाणिकपणा आणि विश्वासार्हतेच्या बळावर त्यांनी आपला व्यवसाय उभा केला. व्यवसायासोबतच सामाजिक बांधिलकीही त्यांनी जपली होती.
कुडाळदेशकर आद्य गौड ब्राह्मण समाजसेवा मंडळ, कणकवलीच्या विविध उपक्रमांमध्ये ते नेहमी सक्रिय सहभाग घेत असत. समाजाच्या उन्नतीसाठी त्यांनी निरपेक्ष भावनेने काम केले. त्यांचे दुकान हे अनेकांसाठी संपर्क कार्यालयच बनले होते. सामाजिक व सांस्कृतिक चळवळीत त्यांचा मोठा वाटा होता.
त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे. त्यांच्यावर आज दुपारी सुमारे ३ वाजण्याच्या दरम्यान कणकवली येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. राजू आजगावकर यांच्या निधनामुळे कुडाळदेशकर समाज बांधवांकडून शोक व्यक्त करण्यात आला आहे.












