पाचल / वार्ताहर:
राजापूर तालुक्यातील मूर या गावी रविंद्र भाबांडे याच्यावर बिबट्याने हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले आहे. या घटनेने मूर, वाळवड, कार्जिडा, कोळंब, तळवडे परिसरात प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे. हि घटना बुधवार दि १८ रोजी रात्री १२ त ते १२.३० दरम्यान घडली…
सदरचे वृत्त असे की, रविंद्र भांबाडे हे कोळंब तिटा येथे असलेल्या घरामध्ये एकटेच रहात असतात. त्यांची पत्नी व मुले ही मुंबई मध्ये रहात असून ते एकटेच गावी रहात होते. त्यांनी स्व:ताचे रक्षण करण्यासाठी एक दोन कुत्रे पाळले आहेत. त्यांच्या घरा जवळच जंगलमय रान, झाडी असल्याने बिबट्याचा नेहमीच या परिसरात मुक्त संचार सुरू होता. त्यातच रवि भांबाडे यांनी पाळलेल्या कुत्र्यांच्या वासाने रात्री १२.३० वा सुमारास कुत्रा भूंकू लागला म्हणून रवि भांबांडे यांनी आपले घराचे दार उघडून बाहेर पहावयास आले असता दरम्यानच्या काळात बिबट्याने थेट घरामध्ये घूसून कुत्र्यावर झडप घातली. बिबट्या चक्क घरात घुसला हे पाहून भांबडे यांना काही सुचेनासे झाले . शेवटी कुत्र्याला वाचवणे हे गरजेचे होते. म्हणून घरातील मिळेल ती वस्तू घेवून रवि भांबाडे यांनी बिबट्या वरहल्ला करण्यास सुरुवात केली. त्यामुळे बिबट्याने कुत्र्याला सोडले आणि भांबडे यांच्यावर हल्ला केला. या घटनेची माहिती आजुबाजूच्या शेजारच्या लोंकांनी मिळताच आरडाओरडा केली. त्यामुळे बिबट्या भांबाडे यांना सोडून बाजूचच्या जंगलात पसार झाला.या हल्ल्यात भांबडे गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय रायपाटण येथे दाखल करण्यात आले आहे. या घटनेने मूर परिसरातील गावांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे.











