सीए, करसल्लागारांच्या स्पोर्ट्स कार्निव्हलचे उद्घाटन

रत्नागिरी : सीए  इन्स्टिट्यूट रत्नागिरी शाखा आणि करसल्लागार असोसिएशन रत्नागिरी जिल्हा या दोन्ही संस्थांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्पोर्टस कार्निव्हलचे उद्घाटन सुवर्णसूर्य फाउंडेशनचे संस्थापक संचालक व धावपटू प्रसाद देवस्थळी यांच्या हस्ते झाले.


गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या जवाहर मैदानावर या स्पर्धा होणार आहेत. क्रिकेटच्या मैदानावर श्रीफळ वाढवून श्री. देवस्थळी यांनी उद्घाटन केले. त्यांनी या प्रसंगी सांगितले की, कोणत्याही संस्थेचे सुयोग्य आर्थिक व्यवस्थापन सीए, करसल्लागार करत असतात. सर्व सीए, करसल्लागार हे शारीरिकदृष्ट्या सक्षम असले की संस्थेलाही आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी फायदा होत असतो. यात स्पोर्टस कार्निव्हल हा एक मैलाचा दगड आहे.

या वेळी करसल्लागार असोसिएशनचे अध्यक्ष रमाकांत पाथरे, सीए इन्स्टिट्यूट रत्नागिरी शाखाध्यक्ष सीए मंदार जोशी यांच्यासमवेत पदाधिकारी, तसेच प्रायोजक एंजल वनचे चॅनल पार्टनर राजेश सोहनी, एयू स्मॉल बॅंकेचे प्रतिनिधी,ज्येष्ठ सीए भूषण मुळ्ये, सीए श्रीरंग वैद्य यांच्यासमवेत सीए, करसल्लागार उपस्थित होते.