विरण पोईप येथील खचलेल्या पुलाची तातडीने दुरुस्ती!

आम. निलेश राणे यांच्या प्रशासनाला सूचना

मसुरे | झुंजार पेडणेकर मालवण तालुक्यातील पोईप विरण बाजार पेठेतील रस्त्यावरील पुलाचा काही भाग पावसाळ्यात कोसळुन वाहतुकीची कोंडी झाली होती. याबाबत दखल घेऊन सार्वजनिक बांधकाम उपविभाग मालवण यांनी त्वरित बांधकाम करून घेऊन निर्माण झालेली वाहतूक समस्या मार्गी लावली होती. परंतु दोन दिवसा पूर्वी उर्वरित भाग खचला असल्यामुळे पुन्हा वाहतुकीला व जनतेला धोका निर्माण झाला. माजी वित्त बांधकाम सभापती अनिल कांदळकर यांनी त्वरित बांधकाम उपविभाग मालवण यांना कळविल्यानंतर अधिकारी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व आम.निलेश राणे यांच्या सुचनेनुसार ठेकेदार यांना काम करण्याचे आदेश देऊन लगेच या खचलेल्या पुलाचे काम सुरू करण्यात आले आहे. यावेळी सार्वजनिक बांधकाम उपविभाग मालवणचे अधिकारी दिपक तोडमल, माजी वित्त बांधकाम सभापती अनिल कांदळकर, माजी सभापती राजेंद्र प्रभुदेसाई, तालुका संपर्क प्रमुख पंकज वर्दम, शिवसेना पदाधिकारी जितेंद्र ( बांबू ) परब, विजय घाडीगांवकर, बाबाजी नाईक व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.