देवरूख नगर पंचायतीने घेतला महत्वाचा निर्णय

भटक्या श्वानांचे निर्बीजीकरण व अँटी रेबीज लसीकरणची मोहिम सुरु 

देवरूख (प्रतिनिधी)

भटक्या कुत्र्यांची वाढती संख्या आणि रेबीजचा धोका लक्षात घेता संगमेश्वर तालुक्यातील देवरूख नगरपंचायत प्रशासनाने आता कठोर पावले उचलली आहेत. नगरपंचायत प्रशासनाच्यावतीने सोमवारपासून देवरुख नगरपंचायत कार्यक्षेत्रामधील भटक्या श्वानांना पकडून त्यांचे निर्बीजीकरण व अँटी रेबीज लसीकरण करण्याच्या मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे. नगरपंचायतचे मुख्याधिकारी प्रशांत भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली या मोहिमेला सुरूवात करण्यात आली आहे. या मोहिमेचे देवरूखवासियांकडून स्वागत करण्यात येत आहे.

देवरूख शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून त्याचा त्रास देवरूखवासियांना सहन करावा लागत आहे. भटक्या कुत्र्यांनी आजपर्यंत अनेक जणांना चावा घेतला असल्याने नागरिकांमधून चिंता व्यक्त होत आहे. त्यामुळे शहरातील भटक्या कुत्र्यांवर निर्बीजीकरण शस्त्रक्रिया करून त्यांची संख्या नियंत्रणात आणण्याची मागणी नागरिकांकडून होत होती. शहरातील रस्त्यांवर व
गल्लोगल्ली या श्‍वानांच्या झुंडी दिसून येत आहेत. ही भटकी कुत्री नागरिकांवर व वाहनचालकांवर धावून जाणे, गुरगुरणे, वाहनांच्या मागे लागणे एवढेच नव्हे तर अनेकदा नागरिकांचा चावा घेवून त्यांना जखमी करणे अशा अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे सुज्ञ नागरिकांनी नगरपंचायत प्रशासनाकडे संपर्क साधत या भटक्या श्‍वानांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली होती. त्यामुळे आता नगरपंचायत प्रशासनाने भटक्या श्वानांचे निर्बीजीकरण व अँटी रेबीज लसीकरणची मोहिम सोमवारपासून सुरू केली आहे. याबद्दल देवरूखवासियांनी समाधान व्यक्त केले आहे.