राजापूर तालुका पंचायत समितीच्या शिवसेना गटनेतेपदी उमेश पराडकर तर पक्षप्रतोदपदी प्रसाद मोहरकर यांची निवड

राजापूर पंचायत समितीच्या शिवसेना गटनेतेपदी उमेश पराडकर व पक्षप्रतोदपदी प्रसाद मोहरकर यांची निवड झाल्याबद्दल अभिनंदन करताना पालकमंत्री उदय सामंत याप्रसंगी जिल्हा संपर्क प्रमुख राजेंद्र महाडीक, दिपक नागले आदी.
राजापूर (प्रतिनिधी): राजापूर तालुका पंचायत समितीच्या शिवसेनेच्या गटनेतेपदी ज्येष्ठ सदस्य उमेश पराडकर यांची तर पक्ष प्रतोद पदी प्रसाद मोहरकर यांची निवड करण्यात आली आहे.
राज्याचे उद्योगमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री नाम. उदय सामंत यांच्या उपस्थितीत रत्नागिरी येथे झालेल्या जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांच्या बैठकीत जिल्हा परिषदेसह पंचायत समितीच्या गटनेते व पक्ष प्रतोदांची निवड करण्यात आली. तशी माहिती शिवसेना तालुका प्रमुख दिपक नागले यानी दिली आहे.
राजापूर तालुका पंचायत समितीच्या शिवसेनेच्या गटनेतेपदी  निवड झालेले उमेश पराडकर हे दुसऱ्यांदा पंचायत समिती सदस्य म्हणून निवडून आलेले आहेत त्यांनी या पुर्वी तालुका पंचायत समितीचे उपसभापती पद देखील भूषविलेले आहे. तर पक्ष प्रतोद पदी निवड झालेले प्रसाद मोहरकर हे प्रथमच जुवाठी पंचायत समिती गणातून निवडून आलेले आहेत.
पराडकर यांची गटनेता तर मोहरकर यांची पक्षप्रतोदपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे आमदार किरण सामंत यांनी अभिनंदन केले आहे. तर त्यांचे सर्वत्र  अभिनंदन होत आहे.
तालुका पंचायत समिती सभापती पदाचे आरक्षण हे नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला असल्याने आता पदी या पदी कोणाची वर्णी लागणार याबाबत उत्सुकता लागून राहिली आहे. सभापती व उपसभापती निवडीचा कार्यक्रम अद्याप जाहीर न झाल्याने या पदासाठी इच्छुक उमेदवारांना प्रतिक्षा करावी लागणार आहे.