​ कोंडये देऊळवाडीत मानवी वस्तीत घुसलेल्या बिबट्याचा वानरावर हल्ला; फौजी जवानाच्या प्रसंगावधानामुळे मुक्या प्राण्याला जीवदान

कोंडये गावात घबराट; मधल्या वाडीतही बिबट्याचा धुमाकूळ, खुराड्यातील कोंबड्या पळवल्या; पाळीव जनावरांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

देवरूख (प्रतिनिधी):

​संगमेश्वर तालुक्यातील कोंडये देऊळवाडी येथे बुधवारी रात्री घडलेल्या एका भीषण घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. भक्ष्याच्या शोधात थेट मानवी वस्तीत घुसलेल्या बिबट्याने एका खोपटीच्या छतावर बसलेल्या वानरावर अचानक हल्ला चढवला. सुदैवाने, घटनास्थळी उपस्थित असलेल्या एका भारतीय सैनिकाच्या प्रसंगावधानामुळे आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे बिबट्याला माघार घ्यावी लागली, ज्यामुळे जखमी वानराचे प्राण थोडक्यात वाचले. मात्र, या घटनेनंतर कोंडये देऊळवाडीसह संपूर्ण फुणगूस परिसरात प्रचंड घबराट पसरली आहे.

कोंडये देऊळवाडी येथील रहिवासी रवींद्र मुंडेकर यांच्या घराशेजारी असलेल्या लाकडाच्या खोपटीच्या छतावर रात्री सुमारे ९:३० वाजण्याच्या सुमारास एक वानर बसले होते. परिसर शांत असताना आणि अंधाराचा फायदा घेत जंगलाच्या बाजूने आलेल्या बिबट्याने अचानक लाकडाच्या खोपटीवर चढून वानरावर थेट झडप घातली. बिबट्याचे अणकुचीदार सुळे आणि पंजे रुतताच वानराने जीवाच्या आकांताने आर्त किंचाळी मारली. या भेसूर आवाजाने आजूबाजूचा परिसर सुन्न झाला. वानराचा आर्त आक्रोश ऐकताच कृष्णा मुंडेकर यांच्या घरी वास्तव्यास असलेले जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षिकेचे पती तथा भारतीय सैन्यात कार्यरत असलेले जवान सुभाष येसणे यांनी क्षणार्धात घराबाहेर धाव घेतली. समोर बिबट्या वानरावर हल्ला करत असल्याचे निदर्शनास येताच, जवान येसणे यांनी कसलाही विचार न करता अत्यंत निर्भीडपणे बिबट्याच्या दिशेने मोठा आरडाओरडा करण्यास सुरुवात केली.

जवानाचा दणकेबाज आवाज ऐकून निलेश मुंडेकर, संतोष दसम, सागर शितप आणि मधुकर दसम हे ग्रामस्थही काठ्या व टॉर्च घेऊन तातडीने घटनास्थळी धावून आले. ग्रामस्थांचा वाढता गदारोळ आणि टॉर्चचा प्रकाश पाहून बिबट्याचा धीर सुटला. बिबट्याने जखमी वानराला छतावरच सोडून जंगलाच्या अंधारात धूम ठोकली. जवानाच्या वेळेवर दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे वानराला नवसंजीवनी मिळाली. बिबट्याने केलेल्या हल्ल्याची तीव्रता एवढी भीषण होती की, लाकडी खोपटीवरील कौलांवर आणि छतावर रक्ताचे डाग स्पष्टपणे दिसून आले. हे दृश्य पाहून घटनास्थळी जमलेले ग्रामस्थ चक्रावून गेले. रात्रीच्या वेळी थेट मानवी वस्तीत, तेही घराला लागून असलेल्या छतावर चढून बिबट्याने भक्ष्यावर केलेला हा हल्ला अत्यंत धोकादायक मानला जात असून, वन्यप्राण्यांचा वावर मानवी वस्तीच्या किती जवळ पोहोचला आहे, हे या घटनेवरून सिद्ध झाले आहे