रणधीर मोरे यांची बिद्री कारखान्याच्या संचालक पदी बिनविरोध निवड…

 

प्रतिनिधी /रोहन कांबळे

राधानगरी: सरवडे गावचे लोकनियुक्त सरपंच रणधीर विजयसिंह मोरे यांची बिद्री (ता.कागल) येथील श्री दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या संचालक पदी बिनविरोध निवड करण्यात आली.संचालक मंडळाच्या बुधवारी झालेल्या निवडणूक निर्णय अधिकारी प्रादेशिक साखर उपसंचालक जी.जी.माळवी यांनी ही निवड जाहीर केली.
त्यांचे चुलते व दिवंगत संचालक राजेंद्र ऊर्फ आर.के.मोरे हे कारखान्याच्या संचालक पदी विराजमान होते.त्यांच्या निधनामुळे संचालक पद रिक्त होते.
दरम्यान दुधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याने राजेंद्र ऊर्फ आर.के.मोरे यांचे पुतणे रणधीर मोरे यांच्या नावाची शिफारस कारखाना प्रशासनाला केली होती. त्या अनुषंगाने निर्णय प्रक्रिया राबवताना रणधीर मोरे यांचा एकमेव अर्ज संचालकपदासाठी दाखल करण्यात आला होता. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी माळवी यांनी रणधीर मोरे यांची श्री दुधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या संचालकपदी बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. निवडीनंतर
नूतन संचालक रणधीर मोरे म्हणाले, “वडील कै. विजयसिंह मोरे व चुलते कै. राजेंद्र मोरे यांनी ऊस उत्पादक शेतकरी केंद्रस्थानी ठेवून कारखान्याच्या माध्यमातून त्यांच्या जीवनमान उंचावण्याचे कार्य केले. संचालक मंडळाच्या सहकार्याने कारखान्याच्या प्रगतीसाठी, तसेच ऊस उत्पादक सभासदांना अधिक ऊसदरासह कारखान्याच्या लोकाभिमुख योजना सर्व सभासदांपर्यंत पोहोचविण्यासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्नशील राहीन.”
यावेळी कारखान्याचे चेअरमन माजी आमदार के.पी.पाटील, व्हा.चेअरमन मनोज फराकटे तसेच सर्व संचालक मंडळ आदी उपस्थित होते.

चौकट
मोरेंची तिसरी पिढी…

राधानगरी–भुदरगडचे माजी आमदार कै. किसनराव मोरे यांच्या पत्नी पार्वतीबाई मोरे या बिद्री साखर कारखान्याच्या पहिल्या महिला संचालिका होत्या. त्यांचे सुपुत्र कै. विजयसिंह मोरे यांनी तब्बल २० वर्षे संचालकपद भूषविले असून एकदा उपाध्यक्षपदही सांभाळले होते. त्यांचे दुसरे चिरंजीव कै. राजेंद्र मोरे हे डिसेंबर २०२३ मध्ये झालेल्या कारखान्याच्या निवडणुकीत विजयी झाले होते. मात्र २८ डिसेंबर २०२५ रोजी त्यांच्या निधनानंतर आता रणधीर मोरे यांच्या रूपाने मोरे घराण्याची तिसरी पिढी बिद्री साखर कारखान्याच्या संचालक मंडळात प्रतिनिधित्व करणार आहे.

फोटो ओळ :
बिद्री : येथील बिद्री साखर कारखान्याचे नूतन संचालक रणधीर मोरे यांचा सत्कार करताना अध्यक्ष, माजी आमदार के. पी. पाटील, अध्यासी अधिकारी जी. जी. मावळे, उपाध्यक्ष मनोज फराकटे व संचालक मंडळ सदस्य.