हातदे येथील भावेश दत्ताराम धामापूरकर यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
राजापूर (प्रतिनिधी): हातदे येथील दरवर्षी ग्रामदेवतेची पालखी संपूर्ण गावातून मिरवणूक काढली जाते. त्याचवेळी प्रत्येकाच्या घरी पूजा करण्यासाठी काहीवेळ घरी आणली जाते. परंतु, सदर ग्रामदैवतेची पालखी अनुसूचित जातीच्या वस्तीतून कोणाच्याही घरी आणली जात नाही. त्यामुळे त्या वस्तीत राहणाऱ्या नागरीकांच्या धार्मिक भावना दुखावल्या जात आहेत. त्यांच्यावर अन्याय होत आहे. त्यामुळे पालखी सर्ववस्तीमधून अनुसूचित जातीच्या वस्तीसह चर्मकार समाजातील लोकांच्याही वस्तीतून व घरातून नेण्याबाबत योग्य ते आदेश द्यावेत अशी मागणी हातदे येथील भावेश दत्ताराम धामापूरकर यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी रत्नागिरी यांच्याकडे केली आहे.
या निवेदनात त्यांनी गावात साजरा होणाऱ्या पालखी उत्सवाबाबत सविस्तर नमुद करून या कार्यक्रमावेळी गावातील आम्हा अनुसूचित जातीच्या वस्तीसह चर्मकार समाजातील लोकांना सहभागी करून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक तो पोलिस बंदोबस्त क़रावा. तसेच, संबंधित पालखी आयोजक (मानकरी) व संबंधित सवर्ण जातीतील लोकांना विरूद्ध अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा अंतर्गंत गुन्हा नोंदविण्याकामी तात्काळ आदेश व्हावेत अशी मागणी केली आहे.
अन्यथा मागणीप्रमाणे योग्य ते आदेश वा कार्यवाही न झाल्यास महाराष्ट्र अनुसूचित जाती समाजातर्फे २७ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संविधानीक मार्गाने धरणे आंदोलन छेडण्यात येईल तसेच, राष्ट्रीय संघटनामार्फत १६ मार्च रोजी आंदोलन करण्यात येईल असा इशाराही भावेश धामापूरकर यांनी दिला आहे.












