सदर रक्कम सरपंच व तत्कालीन ग्रामपंचायत अधिकारी यांचेकडून वसुलीचे आदेश
गौरव पोंक्षे | माखजन :
मकरंद अनासपुरेच्या चित्रपटात विहिरीचे पैसे काढून प्रत्यक्षात जागेवर विहीरच नसल्याचे आपण पाहिले आहे.पण चित्रपटात स्वप्नवत वाटणारा अपाहार थेट संगमेश्वर तालुक्यातील कळंबुशी ग्रामपंचायती मध्ये उघडकीस आला आहे.सरपंच व तत्कालीन ग्रामपंचायत अधिकारी यांनी संगनमताने चक्क ९ लाख ६९ हजार ५३७ रुपयांचा अपहार केल्याचे चौकशी अंती उघड झाले आहे.संगमेश्वर पंचायत समिती चे गटविकास अधिकारी (गट अ) आनंद लोकरे यांनी चौकशी अंती उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं)जिल्हा परिषद रत्नागिरी यांना सदर केलेल्या अहवालात स्पष्ट अभिप्राय दिला असून सरपंच सचिन चव्हाण व तत्कालीन ग्रामपंचायत अधिकारी संदीप शेडगे यांनी अपहाराची रक्कम प्रत्येकी ५०% भरावी असे नमूद केले आहे.घडलेल्या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे.

कळंबुशी गावातील रहिवासी विजय तुकाराम चव्हाण यानी संगमेश्वर पंचायत समिती कडे तक्रार केली होती.व कामाच्या सखोल चौकशीची मागणी केली होती.सदर कामांची चौकशी व्हावी यासाठी विजय चव्हाण यांनी रत्नागिरी चे पालकमंत्री तथा राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांचेकडे केली होती.अखेर चौकशी पूर्ण होऊन सरपंच व तत्कालीन ग्रामपंचायत अधिकारी यांना दोषी असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
अपहार झालेल्या कामांमध्ये बौद्धवाडी साठी पाखाडी बांधणे रक्कम ४७/हजार ७५०,चौकशी अंती जागेवर काम नसल्याचे आढळून आले हजार,बौद्धवाडी येथील नवीन पाखाडी बांधणे व जुनी दुरुस्त करणे रक्कम १५ हजार,बौद्धवाडी नवीन पाखाडी.बांधणे रक्कम ३५ हजार.ही देखील दोन्ही कामे जागेवर नसल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे.बौद्धवाडीत नवीन पाखाडी बांधणे व जुनी दुरुस्त करणे ५२ हजार २११,संगणक प्रिंटर खरेदी दुरुस्ती ३४८०७/-,स्ट्रीट लाईट रस्त्यावर ब्रॅकेट बसवणे व बिल भरणे ८९०२०/-विद्युत व सौर बांधणीची उभारणी ७९०१८/-,शेवट करांडा येथे पाखाडी बांधणे ८९५०७/-, स्वच्छ भारत अंतर्गत वैयक्तिक कचरा कुंड्या वाटप करणे ९६०००/-, प्लास्टिक साठवण केज रक्कम ५१६९८/-, सार्वजनिक संस्थामध्ये स्वछतागृह बांधणे रक्कम १ हजार ५०/हजार,आरोग्य उपकेंद्र साहित्य देणे रक्कम २७०१५/-, अंगणवाडी साहित्य देणे रक्कम १४हजार ७०८/-, आरोग्य उपकेंद्र साहित्य देणे रक्कम २१५२५/-,अंगणवाडी साहित्य देणे रक्कम १५०००/-, पाण्याची व्यवस्था व मुख्य इमारत लाईट फिटिंग करणे रक्कम १ लाख १२ हजार ४५०/-, ग्रामपंचायत फर्निचर करणे ३ लाख ५० हजार अशा विविध कामाची चौकशी केल्यावर धक्कादायक माहिती पुढे आली आहे.
गटविकास अधिकारी यांनी या सर्व कामांमध्ये अपहार झाल्याचे स्पष्ट अहवालात म्हटले आहे.व ९ लाख ६९ हजार ५३७ रुपयांची वसुली तात्काळ व्हावी,व सरपंच यांनी ५०% रक्कम व तत्कालीन ग्रामपंचायत अधिकारी यांनी ५०% रक्कम भरावी असे उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं)यांना सादर केलेल्या अवहालात म्हटले आहे.













