वनविभागाकडून जीवदान
आंबोली । प्रतिनिधी : फौजदार वाडी गणेश कोंड परिसरात भटक्या कुत्र्यांनी जखमी केलेल्या एका सांबर हरणाच्या पिल्लाला आंबोली वनविभागाच्या रेस्क्यू टीमने सुरक्षितरीत्या वाचवून त्याला जीवदान दिले.
गणेश कोंड भागात भटक्या कुत्र्यांनी एका सांबर पिल्लाचा पाठलाग करून त्याला जखमी केले होते. यावेळी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी हे पिल्लू जवळच असलेल्या पाण्यात शिरले. घटनेची माहिती मिळताच आंबोली वनक्षेत्रपाल यांच्या मार्गदर्शनाखाली रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली. जलद कृती दलाचे सदस्य प्रथमेश गावडे आणि दीपक नाटलेकर यांनी प्रसंगावधान राखून पाण्यात उतरून पिल्लाला बाहेर काढले.
त्यानंतर पिल्लाला आंबोली फॉरेस्ट ऑफिसमध्ये आणण्यात आले. तिथे वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्याने त्याच्यावर उपचार करण्यात आले. पिल्लाची प्रकृती सुधारल्यानंतर त्याला पुन्हा नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले.
या मोहिमेत वनरक्षक अनिकेत आवारे, वन सेवक मंगेश सावंत, एकनाथ पारधी, वसंत गावडे तसेच जलद कृती दलाचे सदस्य प्रथमेश गावडे, दीपक नाटलेकर, श्री कृष्ण गवस, आत्माराम मोहिते आणि निलेश गावडे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.













