सावंतवाडीत भटक्या कुत्र्यांची समस्या गंभीर

सार्वजनिक ठिकाणी खाऊ घालणाऱ्यांवर होणार कारवाई

विशिष्ट ‘फीडिंग सेंटर’ निश्चित केली जाणार
​सावंतवाडी । प्रतिनिधी :
सावंतवाडी शहरात भटक्या कुत्र्यांची समस्या गंभीर बनली असून, नुकतेच एका कुत्र्याने दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा चावा घेतल्याची घटना घडली आहे. या पार्श्वभूमीवर नगरपरिषद प्रशासनाने आक्रमक पवित्रा घेतला असून, सार्वजनिक ठिकाणी भटक्या कुत्र्यांना खायला घालणाऱ्यांवर निर्बंध लादण्याचा निर्णय घेतला आहे.

​नगरपरिषदेत आज या संदर्भात महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला ‘मिशन रेबीज’चे अमित नाईक व त्यांचे सहकारी उपस्थित होते. त्यांच्या सहकार्याने शहरात भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण, लसीकरण आणि त्यांच्या निवाऱ्याच्या नियोजनाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. शहरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढू नये, यासाठी नगरपरिषद प्रशासनाकडून लवकरच विशिष्ट ‘फीडिंग सेंटर’ निश्चित केली जाणार आहेत. या ठरवून दिलेल्या जागांशिवाय इतर कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी कुत्र्यांना खायला घालण्यास मनाई करण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश मुख्याधिकारी विनायक औंधकर यांनी दिले आहेत.

​नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेतही हा मुद्दा गाजला होता. नगरसेवक तौकीर शेख यांनी आरोग्य निरीक्षकांना मिळणाऱ्या धमक्यांचा विषय सभागृहात मांडला होता. आजच्या बैठकीत सार्वजनिक ठिकाणी कुत्र्यांना खायला घालणाऱ्या काही महिलांना बोलावून समज देण्यात आली. मात्र, त्यांनी आपली भूमिका कायम ठेवल्याने नगरसेवकांनी आक्रमक पवित्रा घेत त्यांना फैलावर घेतले. अखेर, प्रशासनाने शहरातील बाजारपेठ व सार्वजनिक ठिकाणी ‘फीडिंग’ करण्यास मज्जाव केला आहे.

​या बैठकीला सभापती आनंद नेवगी, सुनिता पेडणेकर, मोहिनी मडगावकर, निलम नाईक, सुकन्या टोपले, दिपाली भालेकर, दुलारी रांगणेकर, तौकीर शेख, देवा टेमकर, ॲड. सिद्धार्थ भांबुरे, आरोग्य निरीक्षक विनोद सावंत आदी उपस्थित होते. नागरिकांनी प्रशासनाने निश्चित केलेल्या नियमांचे पालन करावे, अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल, असे आवाहन नगरपरिषदेने केले आहे.