रत्नागिरी ः प्रतिनिधी
मंडणगड तालुक्यातील वेसवी-शिपोळे येथील शाळेत जात तेथील विद्यार्थी आणि शिक्षकांना त्रास दिला. त्यानंतर शाळेतील विद्यार्थ्यांच्या पाणी पिण्याच्या नळाचे व पाईपची तोडफोड करुन 2 हजार 500 रुपयांचे नुकसान केले. याप्रकरणी एकाविरोधात बाणकोट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना रविवार 22 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 ते सोमवार 23 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वा.कालावधीत घडली आहे.
जमान सईद लांबे (45,रा.शिपोळे बंदर मंडणगड) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्या विरोधात शफी यासीन इनामदार (67,रा.हडपसर,पूणे) यांनी बाणकोट पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, संशयित जमान लांबे याने वेसवी-शिपोळे येथील इनामदार पब्लिक इंग्लिश स्कुल शाळेत फिर्यादी किंवा शाळेतील शिक्षकांची कोणतीही परवानगी न घेता बेकायदेशिर वारंवार प्रवेश केला. त्यानंतर त्याने शाळेतील शिक्षक व विद्यार्थ्यांना त्रास देण्याच्या उद्देशाने शाळेचा जिना व इमारतीच्या दरवाजाला नेटचा हिरवा कपडा बांधून मुलांना जाण्या-येण्यास अडथळा निर्माण केला. तसेच सर्वांना दमदाटी करत पाणी पिण्याच्या नळाचे व पाईपची तोडफोड करत 2 हजार 500 रुपयांचे नुकसान केले. याप्रकरणी अधिक तपास बाणकोट पोलिस करत आहेत.












