रत्नागिरी ः प्रतिनिधी
दापोली तालुक्यातील मौजे पंचनदी कुणबीवाडी येथे घरफोडी करत अज्ञाताने तब्बल 7 लाखांचा मुद्देमाल लांबवला. घरफोडीची ही घटना रविवार 22 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 ते सायंकाळी 7 वा.कालावधीत घडली आहे.
याबाबत मानशी महेंद्र आयरे (37,रा.पंचनदी कुणबीवाडी दापोली) यांनी दाभोळ पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, रविवारी अज्ञाताने त्यांच्या घराचा मागील दरवाजा जोरात ढकलून त्याव्दारे घरात प्रवेश केला. त्यानंतर त्याने घरातील लोखंडी कपाटातील तिजोरी फोडून त्यातील स्टिलच्या किटलीतील व प्लॅस्टिकच्या डबीत ठेवलेले सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरुन नेले. त्यामध्ये सोन्याची 2 मंगळसूत्रे,सोन्याची कुडी,सोन्याची कानपट्टी, सोन्याच्या 3 अंगठ्या,नथ,चेन आणि रोख 5 हजार रुपये असा एकूण 7 लाख 5 हजार रुपयांचा मुद्देमाल होता. याप्रकरणी अधिक तपास पोलिस करत आहेत.











