सावंतवाडीत ‘मराठी भाषा गौरव दिन’ उत्साहात
सावंतवाडी । प्रतिनिधी : “आपली मातृभाषा मराठी ही केवळ संवादभाषा नसून ती आपली जननी आहे. मुंबईसारख्या महानगरांमध्ये वावरताना अनेकदा मराठी भाषा हरवत चालली आहे की काय, अशी भीती वाटते. मात्र, आज इंग्रजी माध्यमाच्या शाळेत मुलांनी ज्या आत्मीयतेने मराठीचा गौरव केला, ते पाहून मराठीची मुळे खोलवर रुजलेली आहेत याचा आनंद झाला,” असे प्रतिपादन कोकण मराठी साहित्य परिषदेचे (कोमसाप) जिल्हाध्यक्ष मंगेश मसके यांनी केले.
कोकण मराठी साहित्य परिषद (शाखा सावंतवाडी) आणि स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘मराठी भाषा गौरव दिना’च्या कार्यक्रमात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. कुसुमाग्रज अर्थात वि. वा. शिरवाडकर यांच्या जयंतीनिमित्त या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
मराठी टिकवण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज
मराठी भाषेच्या संवर्धनावर भाष्य करताना मसके पुढे म्हणाले की, “आज परदेशात मराठी जपण्यासाठी विशेष प्रयत्न होत असताना, आपण मात्र आपल्याच बोलीतील शब्द विसरत चाललो आहोत. ही छत्रपती शिवाजी महाराज आणि संतांची भाषा आहे. बंद होणाऱ्या मराठी शाळांचे प्रमाण घटवण्यासाठी आणि ही समृद्ध भाषा टिकवण्यासाठी आपण सर्वांनी जाणीवपूर्वक मेहनत घेणे काळाची गरज आहे.”
साहित्यिकांचा सन्मान आणि विद्यार्थ्यांचा उत्साह
या सोहळ्याचे औचित्य साधून ज्येष्ठ मालवणी कवी दादा मडकईकर आणि स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलचे संचालक ॲड. रुजूल पाटणकर यांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन विशेष गौरव करण्यात आला. तसेच, मराठी विषयातील विविध स्पर्धांत यश मिळवलेली विद्यार्थिनी मनवा साळगावकर हिचेही कौतुक करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात दादा मडकईकर यांनी आपल्या बालपणीची कविता सादर करून केली. त्यानंतर, पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी कुसुमाग्रज, केशवसुत, वि. स. खांडेकर, आरती प्रभू, शांता शेळके, मधू मंगेश कर्णिक आणि शिवाजी सावंत यांसारख्या दिग्गज साहित्यिकांच्या जीवनावर प्रकाश टाकला. चिमुकल्यांनी सादर केलेले काव्यवाचन आणि स्वरीत कवितांच्या सादरीकरणाने उपस्थित भारावून गेले होते.
व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा मानस
’कोमसाप’ सावंतवाडीचे अध्यक्ष कवी दीपक पटेकर यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “इंग्रजी माध्यमात शिकणाऱ्या मुलांना आपल्या मायबोलीतून संवाद साधता यावा आणि त्यांना हक्काचे व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. मुलांचा सहभाग पाहता आमचा हा उद्देश यशस्वी झाला आहे.”
या प्रसंगी कोमसाप जिल्हा सचिव ॲड. संतोष सावंत, राजू तावडे, अभिमन्यू लोंढे, ॲड. नकुल पार्सेकर, प्रा. सुभाष गोवेकर, मुख्याध्यापिका प्राची साळगावकर, चैताली वेर्लेकर यांसह मोठ्या संख्येने शिक्षक, पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिनानाथ वारंग यांनी केले, तर आभार मुख्याध्यापिका प्राची साळगावकर यांनी मानले.













