खेड तालुक्यात ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर’ अभियानाचा धडाका

मार्च ते मे दरम्यान महसूल मंडळांमध्ये शिबिरांचे आयोजन

खेड (प्रतिनिधी): खेड तालुक्यातील नागरिकांचे महसूल विषयक प्रश्न मार्गी लावण्यासाठी आणि विविध शासकीय सेवा एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यासाठी ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर’ अभियान टप्पा क्रमांक १ राबविण्यात येत आहे. तहसीलदार सुधीर प्रनिवणे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे या अभियानाचे सविस्तर नियोजन जाहीर केले असून, मार्च ते मे २०२६ या कालावधीत तालुक्यातील ११ महसूल मंडळांमध्ये ही शिबिरे संपन्न होणार आहेत.

या अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी तहसीलदार कार्यालयामार्फत १८ फेब्रुवारी ते ५ मार्च या कालावधीत मंडळ स्तरावर पूर्वतयारी करण्यात येत आहे. यामध्ये गावपातळीवर जनजागृती करणे, प्रलंबित फेरफार निकाली काढणे, ७/१२ मधील चुका दुरुस्त करणे आणि विविध दाखल्यांसाठी अर्ज गोळा करणे यांसारखी कामे केली जात आहेत. या मोहिमेत महसूल विभागासह पंचायत समिती, नगरपरिषद, भूमी अभिलेख, कृषी आणि शिक्षण विभागाचाही सहभाग असणार आहे.

या शिबिरांच्या माध्यमातून नागरिकांना विविध प्रकारचे शासकीय दाखले, संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेचे लाभ मिळतील. तसेच अंत्योदय अन्न योजनेचे लाभ, ७/१२ वाचन मोहिमेअंतर्गत नोंदी अद्ययावत करणे, पानंद रस्त्यांना प्रशासकीय मान्यता देणे आणि घरांसाठी पट्टे वाटप करणे यांसारख्या सेवाही पुरवल्या जाणार आहेत.

अभियानाच्या वेळापत्रकानुसार, मार्च महिन्यात भोस्ते (७ मार्च), तळे (८ मार्च), धामणंद (१४ मार्च) आणि धामणदिवी (१५ मार्च) येथे शिबिरे होतील. एप्रिल महिन्यात कुळवंडी (१० एप्रिल), शिर्शी (११ एप्रिल), चिंचघर (१७ एप्रिल) आणि भरणे (१८ एप्रिल) येथे आयोजन करण्यात आले आहे. तर मे महिन्यात खेड नगरपरिषद (८ मे), आंबवली (९ मे) आणि लवेल (१५ मे) येथे ही शिबिरे पार पडतील.

तरी तालुक्यातील नागरिकांनी संबंधित दिनांकास आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहून या शासकीय सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन तहसीलदार खेड यांनी केले आहे.