देवरूख महाविद्यालयात संत गाडगे महाराज जयंती आणि गुरु तेग बहादुर जयंतीनिमित्त सामूहिक गीत गायन

देवरूख (प्रतिनिधी)
देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत संत गाडगे महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात संत गाडगे महाराजांच्या प्रतिमेला उपप्राचार्य डॉ. सरदार पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी डॉ. पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना संत गाडगे महाराजांच्या स्वच्छता, समाजप्रबोधन व अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्याचा उल्लेख केला. त्यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या विचारांचा आदर्श घेऊन सामाजिक बांधिलकी जपावी, असे आवाहन केले.

महाविद्यालयात “हिंद दी चादर” म्हणून ओळखले जाणारे गुरु तेग बहादुर यांच्या ३५० व्या जयंतीनिमित्त महाविद्यालयात सामूहिक गीत गायनाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी भक्तीभावाने सहभाग घेत गुरु तेग बहादुरजींच्या बलिदान व धर्मरक्षणाच्या कार्याला अभिवादन केले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक मूल्यांची जाणीव व देशभक्तीची भावना अधिक दृढ झाली.