दापोली प्रातिनिधी : दापोली येथील श्री गोपाळकृष्ण ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित येथे सन २०१८-१९ ते २०२२-२३ या कालावधीत झालेल्या गैरव्यवहार प्रकरणी संचालक मंडळावर फौजदारी पात्र न्यासभंगाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. याप्रकरणी ४२ वर्षीय श्रीया जीवन झगडे यांनी दापोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. रत्नागिरीच्या उपजिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांच्या १४ ऑगस्ट २०२४ च्या आदेशानुसार या पतसंस्थेचे लेखापरीक्षण करण्यात आले होते. 
लेखापरीक्षणादरम्यान पतसंस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, इतर संचालक, व्यवस्थापक व कर्ज अधिकारी यांनी संगनमत करून बनावट कागदपत्रांच्या आधारे कर्जे मंजूर केल्याचे उघडकीस आले. संस्थेच्या उपविधीतील नियमांचा भंग करून हे कर्जवाटप करण्यात आले होते. ठेवीदारांनी विश्वासाने ठेवलेल्या रकमांचा अपहार करून त्यांची दिशाभूल करण्यात आली आणि त्यांना गैरहानी पोहोचवण्यात आली. 
या प्रकरणात प्रसाद सूर्यकांत मेहता, सुधीर सदानंद तलाठी, राकेश प्रकाश कोटिया, संजय उमेशचंद्र बुटाला, संजय वसंत साबळे, अतुल काळूराम मेहता, शैला प्रभाकर मेहता, सुप्रिया बाळकृष्ण तलाठी, माधवी माधव शेठ्ये, रमेश भागोजी गिम्हवणेकर, सुनील पांडुरंग धोपट, भिकू रामचंद्र मोरे आणि हेमंत आत्माराम केळकर या सर्व दापोली येथील रहिवाशांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.













